बापुराव चौधरी, उपसंपादक
पुणे : “शरीराची योग्य काळजी घेण्यासाठी चांगल्या सवयी आत्मसात करणे अत्यावश्यक आहे,” असे मनोगत व्यक्त करत सौ. अपेक्षा कौस्तुभ मेमाणे यांनी सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त कस्तुरी केअर फाउंडेशन व विश्वराज हॉस्पिटल, लोणी काळभोर यांच्या संयुक्त विद्यमाने उरुळी कांचन येथील महावीर निवासी मूकबधिर विद्यालय येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून केवळ आरोग्यसेवा नव्हे, तर संवेदनशीलतेचा आणि सामाजिक जाणिवेचा सुंदर संदेशही देण्यात आला.

मूकबधिर विद्यार्थ्यांना शिक्षण देणे, त्यांच्या भावना समजून घेणे आणि त्यांना विविध क्षेत्रांत सक्षम बनवणे हे अत्यंत संयम व समर्पणाची मागणी करणारे कार्य असल्याचे सौ. मेमाणे यांनी सांगितले. अशा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाने पुढे येणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
या आरोग्य शिबिरात विद्यार्थ्यांची सर्वसाधारण तपासणी, दंत तपासणी, नेत्र तपासणी तसेच पोषण व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. डॉक्टरांच्या तज्ज्ञ पथकाने विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना आरोग्यदायी सवयींबाबत सोप्या आणि समजण्यासारख्या पद्धतीने माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि आनंद या उपक्रमाच्या यशाची साक्ष देत होते.
कार्यक्रमास कस्तुरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद मेमाणे, घनश्याम मेमाणे, संध्या मेमाणे, मनिषा मेमाणे, सृष्टी मेमाणे, रुतिका मेमाणे, उत्कर्ष मेमाणे यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉ. सत्यजीत कुलकर्णी, डॉ. दिपाली गायकवाड, डॉ. स्वाती गुरव, डॉ. किरण साळवे उपस्थित होते. तसेच सुरेश शितोळे, दिपक मुंडे, मुख्याध्यापिका स्मिता सपार, बी. एन. भालेराव, कविता पवार, मिनाक्षी वासनिक, नागरगोजे, शाळेचे अध्यक्ष शशिकांत धुरदेव, उद्योजक कौस्तुभ मेमाणे, महासुपर फास्ट न्यूजच्या संपादिका सुवर्णा कांचन, उपसंपादक बापुसो चौधरी, श्री गुरुदत्त सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक सुनील तुपे आणि केसरीचे पत्रकार अमोल भोसले यांनी उपस्थित राहून उपक्रमाचे कौतुक केले.
हा उपक्रम म्हणजे वाढदिवसाच्या आनंदाला सामाजिक सेवेची जोड देणारा प्रेरणादायी आदर्श ठरला. समाजातील वंचित घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्याचा हा प्रयत्न निश्चितच स्तुत्य असून, अशा उपक्रमांमधून समाजातील संवेदनशीलता अधिक दृढ होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.