बापुराव चौधरी, उपसंपादक

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा शंभर टक्के वापर व्हावा, या उद्देशाने एम.ए. मराठी उत्तीर्ण कर्मचाऱ्यांना दोन विशेष वेतनवाढ देण्याचा ठराव विधी समितीने मंजूर केला आहे. हा ठराव अंतिम मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात येणार आहे.

महापालिकेच्या विविध विभागांमार्फत राजभाषा मराठीतून कामकाज अधिक सक्षम व परिणामकारक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या बहुतांश कामकाज मराठीत होत असले तरी, कार्यालयीन व्यवहार, सरकारी कागदपत्रे आणि दैनंदिन प्रशासकीय प्रक्रियेत मराठीचा अधिकाधिक वापर सुनिश्चित करण्यावर भर दिला जात आहे.

मराठी भाषा ही ज्ञान व रोजगाराची भाषा म्हणून अधिक बळकट व्हावी, विज्ञान-तंत्रज्ञान, वैद्यक यांसारख्या क्षेत्रांतील उच्च शिक्षण मराठीत उपलब्ध व्हावे, तसेच नवतंत्रज्ञानाशी सुसंगत मराठी विकसित व्हावी, या व्यापक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

याशिवाय, सर्वसामान्यांना समजेल अशी प्रशासकीय मराठी विकसित करणे आणि बोली भाषांचे जतन व संवर्धन करणे, यालाही या निर्णयातून चालना मिळणार आहे.

मराठीतील लेखन, अनुवाद व अभिव्यक्ती कौशल्य वाढवण्यासाठी तसेच कार्यालयीन संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी प्रशासकीय संवर्गातील कर्मचाऱ्यांनी मराठी विषयात उच्च शिक्षण घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दोन विशेष वेतनवाढ देण्याचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

विधी समितीच्या सभापती सुजाता बोराटे यांनी सांगितले की, मराठी भाषेचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळावे, तसेच तिचे जतन, संवर्धन आणि विकास साधावा, या दृष्टीने हा निर्णय उपयुक्त ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *