बापुराव चौधरी, उपसंपादक
पुणे : अक्षय तृतीयेनिमित्त रविवारी (१९ एप्रिल) श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात होणारी भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात येणार आहेत. विशेषतः श्री छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, लक्ष्मी रस्ता आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे.

अक्षय तृतीयेनिमित्त मंदिरात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त दुचाकी फेरीही मध्यवर्ती भागातून काढण्यात येणार आहे. यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता असून, त्यानुसार वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्दी ओसरेपर्यंत अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त पीएमपी बस आणि इतर वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात येतील. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज रस्ता काही काळासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.
वाहतूक बदल पुढीलप्रमाणे :
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून स्वारगेटकडे जाणारी वाहतूक स. गो. बर्वे चौक (मॉडर्न कॅफे) येथून जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी चौक, डेक्कन जिमखाना, टिळक चौक मार्गे टिळक रस्त्यावर वळविण्यात येईल.
महापालिका भवनकडे जाणाऱ्या पीएमपी बस याच मार्गाने धावतील.
आप्पा बळवंत चौकातून हुतात्मा चौक (बुधवार चौक)कडे जाणारा मार्ग बंद ठेवण्यात येणार असून, ही वाहतूक बाजीराव रस्त्याने वळविण्यात येईल. तसेच लाल महाल चौकातून गणेश रस्त्याकडे जाणारी वाहतूकही पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
वाहनचालकांनी संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.