बापुराव चौधरी, उपसंपादक
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयातील दुसऱ्या मजल्यावरील स्वच्छतागृहात मद्याची बाटली आढळणे आणि वाढती नागरिकांची गर्दी या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरक्षा अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मंत्रालयाच्या धर्तीवर महापालिकेत प्रवेशासाठी विशेष ‘ॲप’ विकसित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून नोंदणी केल्यानंतरच नागरिकांना प्रवेश दिला जाणार आहे.

महापालिकेत दररोज विविध कामांसाठी नागरिक आणि ठेकेदार मोठ्या संख्येने येत असतात. अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी मंगळवार व गुरुवार असे दोन दिवस निश्चित करण्यात आले असले, तरी इतर दिवशीही गर्दी कायम असते. सध्या प्रवेशद्वारावर कागदी पास देऊन प्रवेश दिला जातो. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने ही पद्धत अपुरी ठरत असल्याने आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अधिक कडक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

‘ॲप’चा वापर कसा होणार?
नवीन ॲप सुरू झाल्यानंतर नागरिकांना संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी घरबसल्या वेळ (अपॉइंटमेंट) नोंदवता येणार आहे. नोंदणी करताना नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक द्यावा लागेल. त्यानंतर मोबाईलवर ओटीपीद्वारे क्यूआर कोड मिळेल. हा क्यूआर कोड महापालिकेच्या प्रवेशद्वारावर दाखवून प्रिंट काढता येईल. ही प्रिंट दाखवल्यानंतरच प्रवेश दिला जाईल.
तसेच, ज्या दिवशी वेळ घेतली आहे, त्याच दिवशी प्रवेश मिळणार आहे.
सुरक्षिततेसाठी इतर उपाय
कार्यालयीन वेळेनंतर प्रवेश बंद
ओळखपत्राशिवाय अधिकारी, कर्मचारी व कंत्राटी कामगारांना प्रवेश नाही.
सर्वांच्या बॅगांची यंत्राद्वारे तपासणी
मेट्रोने येणाऱ्यांना मुख्यालयात वाहन पार्किंगस मनाई
हलगर्जीपणा झाल्यास सुरक्षा कर्मचाऱ्यांवर कारवाई
महापालिकेतील शिस्त आणि सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी ही उपाययोजना महत्त्वाची ठरणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.