बापुराव चौधरी, उपसंपादक
पुणे : पुणे जिल्ह्यातील बोरी भडक येथे बारामती इको सिस्टम अँड टेक्नॉलॉजी प्रा. लि. यांच्या बायोगॅस प्रकल्पाचा भूमीपूजन सोहळा आज उत्साहात पार पडला. या प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी पद्मविभूषण डॉ. विजय भाटकर, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल बाबा जगदाळे तसेच आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर बायोगॅस प्रकल्प स्थानिक सेंद्रिय कचरा आणि शेणावर आधारित असून, त्यातून स्वच्छ व पर्यावरणपूरक ऊर्जानिर्मिती केली जाणार आहे. या माध्यमातून परिसरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न सोडवण्यास मदत होणार असून, पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळणार आहे.

प्रकल्पातून निर्माण होणारा गॅस घरगुती तसेच औद्योगिक वापरासाठी उपलब्ध होणार आहे. तसेच उर्वरित सेंद्रिय घटकांपासून तयार होणारे सेंद्रिय खत शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार असून, शेती खर्च कमी करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, या उपक्रमामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी स्वच्छ ऊर्जा व शाश्वत विकासासाठी अशा प्रकल्पांची गरज अधोरेखित केली. कंपनीचे मालक अभिमन्यू नागवडे यांच्या माहितीनुसार, हा प्रकल्प लवकरच पूर्ण करून कार्यान्वित करण्यात येणार आहे.
उरुळी कांचन परिसरातील हा बायोगॅस प्रकल्प पर्यावरण संरक्षण, कचरा व्यवस्थापन आणि ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि स्वागत प्रसिद्ध निवेदिका ईशा आबनावे यांनी केले.