बापुराव चौधरी, उपसंपादक
पुणे : प्रशासकीय उदासीनता किंवा पायाभूत सुविधांतील त्रुटींमुळे द्रुतगती महामार्ग धोकादायक ठरू नयेत, असे स्पष्ट निरीक्षण नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने रस्ते सुरक्षेबाबत महत्त्वाची देशव्यापी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या प्रकरणी न्यायालयाने रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) तसेच सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना नोटिसा बजावल्या आहेत.

राजस्थानमधील फालोदी येथे २ नोव्हेंबर २०२५ रोजी आणि तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात ३ नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण अपघातांमध्ये एकूण ३४ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनांची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून (सुओ मोटू) याचिका दाखल केली आहे. सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती जे. के. माहेश्वरी आणि न्यायमूर्ती अतुल शरदचंद्र चांदुरकर यांच्या खंडपीठाने नमूद केले की, देशातील एकूण रस्त्यांपैकी राष्ट्रीय महामार्गांचे प्रमाण केवळ दोन टक्के असले तरी, रस्ते अपघातांतील मृत्यूंपैकी जवळपास ३० टक्के मृत्यू याच मार्गांवर होतात.

न्यायालयाने राष्ट्रीय महामार्गांवरील जड आणि व्यावसायिक वाहनांच्या बेकायदा पार्किंगवर बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. महामार्गांवर किंवा त्यांच्या पक्क्या दुय्यम रस्त्यांवर कोणतेही वाहन उभे करू नये; फक्त निर्धारित थांबे, विश्रामस्थळे किंवा सुविधा केंद्रांवरच वाहनांना थांबण्याची परवानगी असावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रगत वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (ATMS), राज्य पोलिसांना तात्काळ सतर्कता इशारे, जीपीएस आधारित निरीक्षण, वेळेनिशी छायाचित्र पुरावे आणि एकीकृत ई-चलन प्रणालीचा वापर करण्यावर न्यायालयाने भर दिला आहे.
‘जीवनाचा अधिकार म्हणजे सुरक्षित वातावरणाची हमी’
“बेकायदा पार्किंग किंवा वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणांसारख्या टाळता येणाऱ्या कारणांमुळे एखाद्याही व्यक्तीचा मृत्यू होणे हे शासकीय यंत्रणांचे सामूहिक अपयश आहे. राज्यघटनेच्या अनुच्छेद २१ अंतर्गत जीवनाचा अधिकार हा केवळ जीवघेण्या गुन्ह्यांपासून संरक्षणापुरता मर्यादित नसून, सुरक्षित आणि मानवी जीवनाला महत्त्व देणारे वातावरण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारवर आहे,” असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
या मार्गदर्शक तत्त्वांमुळे देशातील महामार्गांवरील सुरक्षाव्यवस्थेत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.