बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : शाळेत जाण्याच्या वयात असलेल्या १२ वर्षीय मुलाकडून शाळेतील वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी मजुरी करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार लोणीकंद परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी संबंधित बांधकाम ठेकेदाराविरुद्ध बालमजुरीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-अहिल्यानगर रस्त्यालगत वाढेगाव परिसरातील जिल्हा परिषद शाळेत वर्गखोल्यांचे बांधकाम सुरू आहे. कामासाठी ठेकेदाराने विविध मजुरांना बोलाविले होते. कर्नाटक येथील एक दाम्पत्य मजुरीसाठी येथे आले असून, त्यांच्यासोबत त्यांचा १२ वर्षीय मुलगाही होता.

दरम्यान, बांधकामस्थळी स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना संबंधित ठेकेदाराने अल्पवयीन मुलाकडून अवजड साहित्य उचलण्याचे काम करून घेतल्याचे आढळून आले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली.

त्यावेळी मुलाकडून प्रत्यक्ष काम करून घेतले जात असल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी पोलीस शिपाई रोहित माने यांनी फिर्याद दिली असून, संबंधित ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक थेरे पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *