बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे ; क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्मद्विशताब्दी, चवदार तळे सत्याग्रहाची शताब्दी तसेच त्यांच्या नगरसेवक पदाच्या दीडशे वर्षांच्या निमित्ताने महापालिकेच्या वतीने वर्षभर विविध

सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमांच्या आयोजनासाठी विशेष समिती स्थापन करण्याचे आदेश उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी दिले असून, स्थायी समितीने यास सर्वसाधारण सभेत मान्यता दिली आहे.

हे वर्ष ‘सामाजिक सुधारणा वर्ष’ म्हणून साजरे करण्यात यावे, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या प्रेरणादायी कार्याला उजाळा देण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत, अशी सूचना वाडेकर यांनी केली होती. संबंधित प्रस्तावावर चर्चा होत असताना सभेच्या अध्यक्षस्थानी ते होते.

दरम्यान, नाना पेठ येथील ‘दि डीप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया’ या संस्थेस देण्यात आलेल्या महापालिकेच्या जागेचा करार संपुष्टात आला असून, तो नूतनीकरण करण्यासही स्थायी समितीने मान्यता दिली आहे. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या या संस्थेचे कार्य लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला.

सदर जागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य महाविद्यालय, ज्योतिराव फुले मुलींचे हायस्कूल आणि ज्योतिराव फुले हायस्कूल कार्यरत आहेत. या संस्थेला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाव्यतिरिक्त कोणतेही शासकीय अनुदान मिळत नसल्याने, जागा कायम ठेवण्याचा प्रस्तावही मान्य करण्यात आला.

ही वास्तू ऐतिहासिक महत्त्वाची असून, याच ठिकाणी महात्मा फुले यांनी शाळा सुरू केली होती. तसेच येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही वावर राहिल्याने या स्थळाला विशेष ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *