बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : हृदयात करुणा, प्रेम आणि एकात्मतेची जाणीव जागृत झाली की मनुष्य संकुचित स्वार्थांच्या पलीकडे जाऊन संपूर्ण सृष्टीच्या कल्याणासाठी कार्यरत होतो, याचा प्रत्यय ‘मानव एकता दिवस’ निमित्त पुन्हा एकदा आला.

युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंहजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देशभर हा दिवस श्रद्धा आणि समर्पणभावाने साजरा करण्यात आला.

या निमित्ताने चंदननगर येथील संत निरंकारी सत्संग भवन, फॉरेस्ट पार्क येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये यशवंतराव रुग्णालय, ससून रुग्णालय, औंध रुग्णालय रक्तपेढी तसेच निरंकारी रक्तपेढीच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी रक्तदात्यांची आवश्यक तपासणी करून संपूर्ण प्रक्रिया सुरक्षित आणि सुव्यवस्थित पद्धतीने पूर्ण केली. या उपक्रमातून एकूण ५५१ युनिट रक्त संकलित करण्यात आले.

शिबिरात स्वच्छता, शिस्त आणि सेवाभाव यांना विशेष प्राधान्य देण्यात आले होते. त्यामुळे हा उपक्रम केवळ रक्तदानापुरता मर्यादित न राहता मानवता, करुणा आणि सामाजिक उत्तरदायित्वाचे प्रभावी प्रतीक ठरला. ‘मानवाने मानवावर प्रेम करावे आणि एकमेकांचे आधार बनावे’ हा संदेश यावेळी ठळकपणे अधोरेखित झाला.

संत निरंकारी मंडळाचे सचिव श्री जोगिंदर सुखीजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील सुमारे २१२ ठिकाणी अशा रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, जवळपास ४० हजार युनिट रक्त संकलित झाले आहे. मागील चार दशकांपासून सुरू असलेल्या या परंपरेत आतापर्यंत ९,१७४ शिबिरांतून १५ लाखांहून अधिक युनिट रक्त संकलित झाले आहे.

निष्काम सेवा, परोपकार आणि मानवतेप्रती असलेली निष्ठा यांचे हे जिवंत उदाहरण असून, समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *