बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : चंदननगर पोलिस स्टेशन येथील दोन पोलिस अंमलदारांनी प्रसंगावधान, तत्परता आणि संवेदनशीलता दाखवत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवले. त्यांच्या या धाडसी कामगिरीबद्दल पोलिस ठाण्यात त्यांचा सत्कार करण्यात आला.

दि. २७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास महात्मा फुले मार्शल पथकातील पोलिस अंमलदार क्रमांक २८१७ तलवारे व पोलीस अंमलदार क्रमांक ७७९ सतीश कतारी हे दिवसपाळीच्या कर्तव्यावर होते. त्यावेळी एमडीटी मशीनवर CFS क्रमांक ३६२३०८५० द्वारे आत्महत्येच्या प्रयत्नाबाबत कॉल प्राप्त झाला.

कॉल मिळताच दोन्ही अंमलदारांनी तात्काळ कॉलरशी संपर्क साधला. कॉलरने दिलेल्या माहितीनुसार त्याचे वडील घराचा दरवाजा आतून बंद करून आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याचे समजले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मार्शल पथक त्वरित दिलेल्या पत्त्यावर पोहोचले.

घटनास्थळी दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी विलंब न करता वेल्डरला बोलावून दरवाजा उघडून घेतला. घरात प्रवेश केल्यानंतर संबंधित व्यक्ती गळफास घेण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसून आले. क्षणाचाही विलंब न करता अंमलदारांनी त्यांना खाली उतरवून सुरक्षितरीत्या बेडवर बसवले.

यानंतर संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्या व्यक्तीस पोलीस स्टेशनमध्ये आणून समुपदेशन करण्यात आले व नंतर कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.

या संपूर्ण घटनेत दाखवलेल्या धाडस, सतर्कता आणि मानवतावादी दृष्टिकोनाबद्दल वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलेश बडाख व पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल धस यांच्या हस्ते अंमलदार तलवारे व कतारी यांचा हजेरीदरम्यान सत्कार करण्यात आला. त्यांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *