बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : व्यवसायासह एकूण जीवनात मूल्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मूल्यांचे पालन केल्याने व्यक्तीला अपार शक्ती मिळते, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मूल्यांशी तडजोड करू नये, असे प्रतिपादन ज्येष्ठ उद्योजक व वायुसेनेचे निवृत्त अधिकारी रमेश अग्रवाल यांनी केले.

पुणे ब्रदरहुड फाउंडेशनच्या नव्या कार्यकारिणीच्या पदग्रहण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी उद्योजक नरेंद्र गोयल यांनी माजी अध्यक्ष सागर अग्रवाल यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली.

कार्यक्रमास संस्थापक अध्यक्ष ईश्वरचंद गोयल, कार्यकारी संचालक पवन बंसल, संजय अग्रवाल, सेवा भारती पश्चिम महाराष्ट्रचे कोषाध्यक्ष सुधीर जावळेकर, द्वारका जालान, जीतो एपेक्सचे अध्यक्ष विजय भंडारी, मनोज छाजेड, सीए जितेश अग्रवाल, रूची गोयल, गीता गोयल, कांता गोयल, रामशरण गुप्ता, प्रेमचंद मित्तल, जय भगवान गोयल यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

रमेश अग्रवाल म्हणाले, प्रत्येक उद्योजक व्यवसायाच्या प्रगतीसाठी ठराविक दृष्टीकोन ठेवतो आणि त्यानुसार कार्यपद्धती ठरवतो. मात्र, त्या दृष्टीकोनाला यशस्वी करण्यासाठी मूल्यांचा भक्कम पाया असणे अत्यावश्यक आहे. मूल्यांशिवाय व्यवसायाची दिशा डळमळीत होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.

कर्मचाऱ्यांच्या भूमिकेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, कोणत्याही व्यवसायाच्या यशात कर्मचाऱ्यांचे योगदान मोलाचे असते. त्यामुळे त्यांना केवळ कर्मचारी न मानता सहकारी म्हणून वागवावे. त्यांना कुटुंबाचा भाग मानल्यास त्यांच्यात आपलेपणा निर्माण होतो आणि ते प्रत्येक परिस्थितीत संस्थेसोबत ठामपणे उभे राहतात.

“शंभर मूर्तींची पूजा करण्यापेक्षा शंभर हातांना कौशल्य देणे अधिक महत्त्वाचे आहे,” असे सांगत त्यांनी कौशल्यविकासाचे महत्त्व अधोरेखित केले. कुशल हात स्वतःसह कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीत मोठा वाटा उचलतात, असेही ते म्हणाले.

नवीन अध्यक्ष नरेंद्र गोयल यांनी सांगितले की, पुणे ब्रदरहुड फाउंडेशनने गेल्या २७ वर्षांत उल्लेखनीय प्रगती साधली आहे. या मंचाच्या माध्यमातून सामाजिक तसेच व्यावसायिक नातेसंबंध दृढ होण्यास मदत होते. आपल्या कार्यकाळात कार्यक्रमांची संख्या वाढविणे, सदस्यांचा सहभाग वाढविणे, महिलांच्या सहभागाला चालना देणे आणि नव्या पिढीला संस्थेशी जोडण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

नवी कार्यकारिणी :
नरेंद्र गोयल (अध्यक्ष), अरविंद अग्रवाल (सचिव), संदीप पी. अग्रवाल – सीए (कोषाध्यक्ष), योगेश जैन (संयुक्त सचिव), सागर अग्रवाल (आयपीपी), संजय बी. अग्रवाल (उपाध्यक्ष), मुकेश कानोडिया (उपाध्यक्ष–१), संजय बंसल, अरुण कुमार सिंघल, राकेश अग्रवाल, प्रशांत अग्रवाल, जितेंद्र बंसल, राजेश एस. मित्तल, शैलेश अग्रवाल, अजय जिंदल, अनूप गर्ग.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *