बापुराव चौधरी, उपसंपादक
पुणे : रिपब्लिकन पक्षाच्या सर्व गटांनी आणि आंबेडकर चळवळीतील विविध घटकांनी एकत्र यावे, अशी आंबेडकरी समाजाची तीव्र अपेक्षा आहे. मात्र, एकत्रीकरण शक्य होत नसेल तर पक्षाचा वेगाने विस्तार करणे हाच पर्याय उरतो, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.

पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, रिपब्लिकन पक्ष हा सर्व समाजघटकांना जोडणारा पक्ष असून त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश अण्णा मुळे यांनी पक्षात प्रवेश केला असून त्यांच्याकडे मराठा आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून मराठा आणि दलित समाजात एकात्मता निर्माण करण्याचा प्रयत्न होणार आहे.

स्वातंत्र्यानंतर संविधानामुळे समाजात मोठे परिवर्तन झाले असून देशात स्थैर्य टिकून आहे, असे सांगताना आठवले म्हणाले की, उघडपणे जातीय भेदभाव कमी दिसत असला तरी काही ठिकाणी दलितांवरील अत्याचार अद्याप घडत आहेत. त्यामुळे सर्वांगीण सामाजिक परिवर्तनासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रात पक्षाला सत्तेत अपेक्षित प्रतिनिधित्व मिळाले नसल्याची खंत व्यक्त करत त्यांनी विधान परिषदेची एक जागा, दोन महामंडळांची अध्यक्षपदे आणि विविध महामंडळांमध्ये ५० सदस्य देण्याची मागणी केली.

पुण्यातील आंबेडकर भवन परिसरातील जागा स्मारकासाठी देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आश्वासन तातडीने पूर्ण करावे, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच कोरेगाव भीमा येथील विजय स्तंभाजवळ २०० एकर जागेत स्मारक उभारण्यासाठी जमीन उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.
१४ ऑक्टोबर, धम्मचक्र दिनानिमित्त साताऱ्यातून सामाजिक समरसता मार्च काढण्यात येणार असून त्याचा समारोप पुण्यात होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. साताऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मातोश्रींचे स्मारक उभारण्याची मागणीही त्यांनी केली.
लोकप्रतिनिधींनी संयम पाळावा
गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून निर्माण झालेल्या वादावर प्रतिक्रिया देताना आठवले म्हणाले की, नव्या आवृत्तीत शीर्षकात बदल करणे शक्य होते. मात्र, आमदार संजय गायकवाड यांनी केलेली आक्रमक भूमिका योग्य नसून लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वक्तव्य करणे आवश्यक आहे.
धार्मिक गुरूंनी प्रबोधनावर भर द्यावा
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या बाबा बागेश्वर यांच्या वक्तव्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. धार्मिक गुरूंनी वाद निर्माण करण्यापेक्षा समाजप्रबोधनावर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले. तसेच भोंदूगिरी करणाऱ्यांवर कारवाई करून सर्व बाबांची सखोल चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.