बापुराव चौधरी, उपसंपादक

पुणे : महाराष्ट्र दिनाच्या मंगलमय औचित्य साधत, विश्वमंगल मराठी फाऊंडेशनच्या वतीने मराठी भाषा, संस्कृती आणि कर्तृत्वाचा जागतिक स्तरावर गौरव करण्याचा प्रेरणादायी उपक्रम आळंदी येथे उत्साहात पार पडला.

‘झेंडा मराठीचा’ या अभिमानस्पद संकल्पनेतून आयोजित ग्रंथदिंडीने उपस्थितांमध्ये मराठी अस्मितेचा जाज्वल्य अभिमान जागवला.

या सोहळ्याचे अध्यक्षस्थान दक्षिण सोलापूरचे मा.मंत्री व आमदार सुभाष देशमुख यांनी भूषविले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी भाषा संवर्धन, उद्योजकतेचा विकास आणि मराठी माणसांना जागतिक स्तरावर एकत्र आणण्याचा दृढ संकल्प व्यक्त करण्यात आला.

ग्रंथदिंडीचे प्रमुख आकर्षण ठरला महानुभाव सांप्रदायातील मराठीचा आद्य ग्रंथ ‘लीळाचरित्र’. भास्कर पाठावर आधारित आणि पंजाबी कुलाचार्य प.पू.प.म. श्री कृष्णराजबाबा शास्त्री पंजाबी यांनी मराठीत अनुवादित केलेला हा ग्रंथ अत्यंत सन्मानपूर्वक दिंडीत ठेवण्यात आला. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भक्तिभावाच्या वातावरणात हा ग्रंथ मिरवणुकीत अग्रस्थानी विराजमान होता.

श्रीक्षेत्र आळंदीच्या पावन भूमीतून निघालेल्या या दिंडीने सांस्कृतिक वारशाची जाणीव नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य साधले. मराठी भाषेचा जागतिक प्रसार, संस्कृतीचे जतन आणि उद्योजकतेचा विस्तार या त्रिसूत्री ध्येयाने भारलेला हा उपक्रम उपस्थितांच्या मनावर ठसा उमटवून गेला.

मराठी अभिमानाच्या या सोहळ्याने ‘मराठी माणूस एकत्र, सक्षम आणि जागतिक’ या विचाराला नवचैतन्य देत महाराष्ट्र दिन अधिक अर्थपूर्ण ठरविला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *