बापुराव चौधरी, उपसंपादक
पुणे : वरकरणी सर्वसामान्य भासणाऱ्या सेवाव्रती कर्मशिल्पी कार्यकर्त्यांचा भव्य सत्कार सोहळा म्हणजे समाजमनाला उभारी देणारा प्रेरणोत्सवच ठरला. पुरस्कार हे केवळ सन्मानचिन्ह नसून समाजसेवेच्या वाटेवर नवे दीप प्रज्वलित करणारे प्रेरणास्त्रोत आहेत, असे प्रतिपादन खादी व ग्रामोद्योग मंत्री नामदार रवींद्र साठे यांनी केले.

पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई यांच्या १०६व्या जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय व राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या सोहळ्यात समाजसेवेचा वसा जपणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला.

समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांच्या निष्काम, त्यागमय आणि समाजकेंद्रित कार्याचा विशेष उल्लेख करताना साठे म्हणाले, “स्वतःचा विचार न करता समाजासाठी झटणारे कार्यकर्तेच राष्ट्रनिर्मितीचे खरे शिल्पकार ठरतात.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विकास वारके होते. व्यासपीठावर विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्रास्ताविकात डॉ. रवींद्र भोळे यांनी गीतेतील कर्मयोगाचा संदर्भ देत पद्मश्री मणीभाई देसाई यांच्या जीवनकार्याचा वेध घेतला.

“कर्मफलाची अपेक्षा न ठेवता केलेले कार्यच खऱ्या अर्थाने समाजाला दिशा देते,” असे ते म्हणाले. दुग्धोत्पादन, पर्यावरण, शिक्षण, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात मणीभाई देसाई यांनी केलेल्या कार्याचा गौरव करत त्यांनी ‘निष्काम कर्मयोग’ हीच त्यांची जीवनरेषा असल्याचे अधोरेखित केले.
या वेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सुमारे सत्तर सामाजिक कार्यकर्त्यांना ‘पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात काही दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
उपस्थित मान्यवरांनी समाजसेवेचा ध्यास घेण्याचे आवाहन केले.
सूत्रसंचालन एल. डी. साळवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुभाष कट्यारमल यांनी व्यक्त केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृहात पार पडलेला हा सोहळा उपस्थितांच्या मनात सेवाभावाची नवी ज्योत प्रज्वलित करून गेला.