
बापुराव चौधरी, उपसंपादक
महाराष्ट्रातील गढी हा आपला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा असून त्याचे जतन होणे अत्यावश्यक आहे. पुरातत्त्व विभागाने पुढाकार घेऊन या गढ्यांचा जिर्णोद्धार करावा, जेणेकरून हा वारसा पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन छत्रपती संभाजी राजे (अध्यक्ष, रायगड प्राधिकरण व माजी राज्यसभा खासदार) यांनी केले.
फुरसुंगी येथील गिर्यारोहक प्रवीण हरपळे लिखित व संपादित ‘गढी: महाराष्ट्रातील एक दुर्लक्षित वास्तू वैभव’ या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. हा कार्यक्रम हडपसर येथील विठ्ठल तुपे नाट्यगृहात पार पडला.
कार्यक्रमास आमदार चेतन तुपे (हडपसर), आमदार राहुल कुल (दौंड), ज्येष्ठ इतिहास अभ्यासक व भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणेचे सचिव पांडुरंग बलकवडे, छत्रपती शंभुराजे राज्याभिषेक ट्रस्टचे अध्यक्ष अमरदादा जाधवराव, ज्येष्ठ साहित्यिक व इंद्रायणी साहित्य परिषदेचे संस्थापक अरुण बोऱ्हाडे, फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेचे नगराध्यक्ष संतोष सरोदे, पुरातत्त्व विभागाचे विलास वाहने, डॉ. दामोदर नाईक (मराठी देशा फाउंडेशन, पुणे) आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार चेतन तुपे यांनी बालपणीच्या चिरेबंदी वाड्यांच्या आठवणींना उजाळा देत, जुन्या वास्तूंचे जतन करण्याची जबाबदारी प्रत्येकाने ओळखली पाहिजे, असे सांगितले.
ग्रंथाचे लेखक प्रवीण हरपळे यांनी या पुस्तकाच्या निर्मितीमागील प्रेरणा, अभ्यास आणि संशोधन याबाबत सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्रातील १०३ गढ्यांचा इतिहास, त्यांची रचना, वैशिष्ट्ये आणि सांस्कृतिक महत्त्व यावर त्यांनी प्रकाश टाकला.
या प्रसंगी विविध दुर्ग संवर्धन व सामाजिक संस्थांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यात शिव सह्याद्री दुर्ग संवर्धन संस्था, गडकिल्ले सेवा समिती, सागरमाता गिर्यारोहण संस्था, देवराई शिवशंभू सोशल फाउंडेशन, शिवमुद्रा मार्शल आर्ट्स, फुरसुंगी सायकलिस्ट ग्रुप आदी संस्थांचा समावेश होता.
ग्रंथ प्रकाशनानिमित्त नाट्यगृहात सुमारे ४०० दुर्मिळ वाडे व गढ्यांचे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘महाराष्ट्रातील दुर्लक्षित वास्तू वैभव’ हे आकर्षक कॉफी टेबल बुक महाराष्ट्र दिनानिमित्त उपलब्ध होत असल्याचा अभिमान इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे यांनी व्यक्त केला.
मराठी देशा फाउंडेशनच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सूत्रसंचालन कवी व गझलकार संतोष घुले यांनी केले, तर आभार प्रदर्शन एव्हरेस्ट वीर श्रीहरी तापकीर यांनी केले.