सुवर्णा कांचन, मुख्य संपादक

पुणे : शिंदवणे शितोळेमळा येथील जमिनीच्या वादातून तिघांनी मिळून एका तरुणावर कटर व कत्तीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना गुरुवारी (ता. ७) दुपारी घडली. या प्रकरणी लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष उत्तम महाडीक (वय ३५, रा. शिंदवणे शितोळेमळा, ता. हवेली, सध्या रा. व्यंकटेश जॉईनिंग ईस्ट सोसायटी, लोणी काळभोर) यांनी फिर्याद दिली आहे.

त्यानुसार मंगेश तुळशीराम महाडीक, तुळशीराम बाजीराव महाडीक व यमुना तुळशीराम महाडीक (सर्व रा. शिंदवणे शितोळेमळा, ता. हवेली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी संतोश महाडीक हे गुरुवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सुदर्शन महाडीक यांच्यासह गट नं. २१७ मधील जागेवर गेले होते. तेथे बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याचे काम सुरू असताना तुळशीराम महाडीक तेथे आले. त्यांनी फिर्यादीस शिवीगाळ करत प्लॉटमध्ये येण्यास मनाई केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

त्यानंतर काही वेळातच मंगेष महाडीक व यमुना महाडीक हे दुचाकीवरून तेथे आले. तिघांनी मिळून फिर्यादीस शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.

यावेळी मंगेश महाडीक यांनी कटरने हल्ला केला. तसेच यमुना महाडीक यांनी कत्ती तुळशीराम महाडीक यांच्या हातात देत “याचे डोके फोडून टाका,” असे सांगितल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानंतर तुळशीराम महाडीक यांनी कत्तीने मारहाण केली. तिघांनी मिळून फिर्यादीस खाली पाडून मारहाण केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर संतोश महाडीक यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. त्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी बीएनएस २०२३ अंतर्गत कलम १०९(१), ११८(१), ३५२, ३५१(२), ३५१(३) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बापुराव चौधरी, उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *