सुवर्णा कांचन, मुख्य संपादक

पुणे : सोरतापवाडी गाव हद्दीत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०६/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून ते दि. ५ मे २०२६ रोजी रात्री साडे दहा वाजेपर्यंत सोरतापवाडी गावच्या हद्दीत कॅनलजवळील रस्ता व मातीच्या ढिगाऱ्याच्या आडोशाला हा प्रकार घडला.

आरोपी आकाश रामहरी ओव्हाळ याने पीडित मुलीकडे पाहून अश्लील हावभाव करत तिचा पाठलाग केला व “आय लव्ह यू” म्हणत तिची छेड काढल्याचा आरोप आहे.

त्यानंतर दि. ५ मे रोजी आरोपी अभिजीत खंडागळे याने पीडितेला बोलावून घेतले. त्यावेळी आरोपी आकाश ओव्हाळ याने जबरदस्तीने तिला मातीच्या ढिगाऱ्याच्या आडोशाला नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार पीडितेने दिली आहे. तसेच पीडितेच्या नातेवाईकांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ मधील कलम 64(1), 74, 351(2), 3(5) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) अधिनियम २०१२ अंतर्गत कलम 4, 8 व 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कांबळे करत आहेत.

बापुराव चौधरी, उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *