सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : पोल्ट्री व्यवसायासाठी पैसे घेऊन तसेच सोन्याचे दागिने गहाण ठेवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या आरोपीला चंदननगर पोलिसांनी नवी मुंबई येथून अटक केली. दत्तात्रय बबन तावरे (वय ३७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी संदीप भिमराव भोसले (वय ३८, रा. लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तावरे याने १८ डिसेंबर २०२२ रोजी पोल्ट्री व्यवसायासाठी फिर्यादींकडून ५० हजार रुपये घेतले. त्यानंतर विश्वास संपादन करून फिर्यादींच्या पत्नीचे साडेतीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण दोन दिवसांसाठी कार्यक्रमाच्या कारणाने घेतले. मात्र, आरोपीने ते दागिने परस्पर मणप्पुरम गोल्ड लोनच्या चंदननगर शाखेत १६ फेब्रुवारी २०२३ रोजी गहाण ठेवून त्यावर १ लाख २९ हजार ५०० रुपयांचे कर्ज घेत फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली.

तपासादरम्यान आरोपीने आणखी तीन जणांची अशाच पद्धतीने फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. गुन्हा दाखल होताच आरोपीने वास्तव्याचे पत्ते बदलले. तसेच मोबाईल क्रमांक बदलून बँक खात्यांचाही वापर बंद केला होता. पोलिस पथकाने त्याचा विविध ठिकाणी शोध घेतला; मात्र तो मिळून आला नव्हता.

वरिष्ठांच्या आदेशानुसार सहायक पोलिस निरीक्षक महेश लामखडे व पोलिस हवालदार किरण घुटे यांनी आरोपीने वापरलेल्या अनेक मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यातून आरोपीचा सध्याचा ठावठिकाणा सानपाडा, नवी मुंबई येथे असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक लामखडे व पोलिस अंमलदार विक्रम गायकवाड यांच्या पथकाने १४ मे २०२६ रोजी सानपाडा येथे जाऊन स्थानिक परिसरात शोधमोहीम राबविली. गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीला सानपाडा गावठाण परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

आरोपीला १५ मे २०२६ रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १७ मे २०२६ पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक महेश लामखडे करीत आहेत.

ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपआयुक्त सोमय मुंडे, सहायक पोलिस आयुक्त नूतन पवार आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक निलेश बडाख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात सहायक पोलिस निरीक्षक महेश लामखडे, सहायक पोलिस निरीक्षक गणेश जगदाळे, पोलिस हवालदार किरण घुटे, पोलिस अंमलदार विक्रम गायकवाड व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *