पुणे : संतपरंपरेच्या पावन संस्कारांनी नव्या पिढीचे व्यक्तिमत्त्व उजळविण्याच्या ध्येयाने प्रेरित होत श्री विठ्ठल देवस्थान ट्रस्ट, डाळिंब (ता. पंढरपूर) संचलित श्री विठ्ठल आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने मोफत बाल वारकरी संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवार, दि. १९ मे २०२६ ते बुधवार, दि. २७ मे २०२६ या कालावधीत श्री विठ्ठल देवस्थान, डाळिंब येथे हे संस्कारमय शिबिर उत्साहात पार पडणार आहे.
विद्यार्थ्यांकडून कोणतीही शुल्क आकारण्यात येणार नसून अनाथ व निराधार मुलांसाठी मोफत शिक्षणाची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

“सुसंस्कारित, चारित्र्यसंपन्न आणि व्यसनमुक्त तरुण पिढी घडविणे, हेच या शिबिरामागील प्रमुख उद्दिष्ट आहे,” अशी माहिती संस्थेचे संस्थापक तथा युवा कीर्तनकार हभप अविनाश महाराज लेकुळे यांनी दिली.
या शिबिरात संत चरित्र व शिवचरित्र व्याख्याने, वारकरी चाली, हरिपाठ, पावल्या यांसह विद्यार्थ्यांसाठी शालेय करिअर मार्गदर्शन आणि माहिती-तंत्रज्ञान प्रशिक्षणाचेही आयोजन करण्यात आले आहे. तसेच मृदंग, तबला, हार्मोनियम या वाद्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार असून गीता, ज्ञानेश्वरी, गाथा आणि संहिता यांवरील मार्गदर्शनातून अध्यात्म व संस्कारांचा संगम साधला जाणार आहे.
शिबिरानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन महोत्सवातही नामरसाची पर्वणी अनुभवायला मिळणार आहे. रविवार, दि. २४ मे रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत स्वरभास्कर हभप ऋषीकेश महाराज नवले यांचे कीर्तन होणार आहे. सोमवार, दि. २५ मे रोजी स्वरभास्कर हभप शामसुंदर महाराज ढवळे, मंगळवार, दि. २६ मे रोजी कीर्तनकेसरी हभप विकास महाराज देवडे तर बुधवार, दि. २७ मे रोजी स्वररत्न हभप कविराज महाराज झावरे यांच्या रसाळ कीर्तनाने महोत्सवाची सांगता होणार आहे.
वारकरी परंपरेतील संस्कार, अध्यात्म आणि आधुनिक ज्ञानाचा सुंदर मेळ घालणाऱ्या या शिबिरात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
बापुराव चौधरी उपसंपादक