सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पिंपरी : विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी पिंपरी चिंचवड विद्यापीठामध्ये (पीसीयू) विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांच्या सहकार्याने उपक्रम राबविण्यात येत आहेत. उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे शिक्षण व्यवस्थेमध्ये एकत्रीकरण करून विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सक्षम करण्याच्या दृष्टीने पीसीयू आणि फिडेल सॉफ्टटेक यांच्यात ‘स्पॉगल एआय डेटा ॲनालिटिक्स लॅब’ स्थापनेसाठी सामंजस्य करार करण्यात आला. हा करार एआय सक्षम विद्यापीठ बनण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण टप्पा असल्याची माहिती पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी दिली.

आकुर्डी येथील ट्रस्ट कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, आयटी आणि आयटीईएस विभाग प्रमुख प्रा. रामकृष्ण वडाली तसेच फिडेल सॉफ्टटेक लिमिटेडचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कुलकर्णी उपस्थित होते.

यावेळी शांताराम गराडे म्हणाले, की पीसीयूमध्ये लवकरच फिडेल सॉफ्टटेकच्या माध्यमातून ‘स्पॉगल एआय डेटा ॲनालिटिक्स लॅब सेंटर’ सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना प्रकल्पाधारित आणि उद्योगसंबंधित साधनांद्वारे डेटा ॲनालिटिक्स, डेटा इंजिनिअरिंग आणि बिझनेस इंटेलिजन्सचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, असाइनमेंट्स, मूल्यांकन आणि प्रमाणपत्रांचा समावेश असेल.
या लॅबमुळे विद्यार्थ्यांना डेटा ॲनालिटिक्स, डेटा इनजेशन, ईटीएल (एक्स्ट्रॅक्ट, ट्रान्सफॉर्म, लोड) प्रक्रिया, प्रेडिक्टिव्ह मॉडेलिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील उच्च मागणी असलेल्या करिअरसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे स्वागत प्रा. रामकृष्ण वडाली यांनी केले, तर आभार ओएसडी डॉ. योगेश भावसार यांनी मानले.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *