सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : थेऊर (ता. हवेली) परिसरातील नागरिकांच्या मदतीसाठी कायम तत्पर असणाऱ्या एका तरुण सर्पमित्राचा साप पकडताना सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. २५ ) सायंकाळी कोलवडी ग्रामपंचायत हद्दीत घडली.

दीपक संतोष जाधव (वय २१, रा. सिद्धेश्वर मंदिर रोड, काळे वस्ती, थेऊर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक जाधव हे अनेक वर्षांपासून परिसरात विषारी तसेच बिनविषारी सापांचे विनामोबदला रेस्क्यू करून त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडण्याचे कार्य करत होते. एक सक्रिय गोरक्षक आणि सर्पमित्र म्हणून परिसरात त्यांची ओळख होती. घरात किंवा शेतात साप निघाल्याची माहिती मिळताच दीपक तत्काळ घटनास्थळी पोहोचून जीवाची पर्वा न करता साप पकडण्याचे काम करत होते.

सोमवारी कोलवडी परिसरात साप निघाल्याची माहिती मिळाल्यानंतर दीपक नेहमीप्रमाणे घटनास्थळी पोहोचले. शोधमोहीम सुरू असताना एका ठिकाणी पडलेल्या पत्र्यांच्या ढिगाऱ्याखाली साप लपल्याचा संशय त्यांना आला. त्यांनी पत्र्याखाली हात घालून साप पकडण्याचा प्रयत्न केला असता दबा धरून बसलेल्या सापाने त्यांच्या हाताला दंश केला.
सर्पदंश झाल्यानंतर उपस्थित नागरिक आणि मित्रांनी दीपक यांना तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी नेहमी धावून जाणाऱ्या धाडसी तरुणाचा अशा दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

या घटनेबाबत बोलताना सर्पमित्र खलील शेख म्हणाले, की सर्पमित्रांनी पूर्णतः प्रशिक्षण घेऊनच सर्प रेस्क्यू करावे. हे करत असताना स्वतःची काळजी घ्यावी. कोणत्याही प्रकारची स्टंटबाजी करू नये. आयुष्य हे एकदाच आहे.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *