
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : वाडेगाव येथील इंगळे मळा परिसरात शेतजमिनीवरून गेलेल्या तुटलेल्या व खाली लोंबकळत असलेल्या विजेच्या तारेमुळे रविवारी सकाळी गंभीर अपघात घडला. या दुर्घटनेत शेतकरी जालिंदर निवृत्ती इंगळे यांची एक शेळी विजेचा धक्का लागून जागीच मृत्युमुखी पडली, तर शेळीला वाचवण्यासाठी गेलेल्या त्यांच्या १६ वर्षीय मुलालाही विजेचा धक्का बसला. सुदैवाने प्रसंगावधान राखल्याने मोठी जीवितहानी टळली.

स्थानिक शेतकरी व नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, शेताच्या बांधावरून गेलेली विजेची तार सुमारे वर्षभरापासून तुटलेल्या अवस्थेत खाली लोंबत होती. याबाबत अनेक वेळा संबंधित वायरमनला माहिती देण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी परिसरातील रोहित्र जळाल्यानंतर दुरुस्तीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनाही ही धोकादायक तार प्रत्यक्ष दाखवून देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही कोणतीही दुरुस्ती करण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

दरम्यान, पंचायत समिती सदस्य कुशल नाना सातव यांनी यापूर्वीच १२ मे २०२६ रोजी उपकार्यकारी अभियंता, महावितरण, उरुळी कांचन यांच्याकडे लेखी तक्रार करून परिसरातील रोहित्र, फ्युज बॉक्स तसेच तुटलेल्या विद्युत तारा यांची पाहणी करून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यानेच हा अपघात घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
रविवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास जालिंदर इंगळे यांनी आपल्या शेळ्या शेतात चरण्यासाठी सोडल्या असता, एका शेळीचा तुटलेल्या विजेच्या तारेच्या संपर्कात येऊन मृत्यू झाला. ही घटना पाहून शेळीला सोडवण्यासाठी गेलेल्या ऋषिकेश जालिंदर इंगळे यालाही विजेचा धक्का बसला. मात्र, त्याने तत्काळ हात मागे घेतल्याने अनर्थ टळला.

घटनेची माहिती मिळताच कुशल सातव यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करावी, तसेच बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
या प्रकरणी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी वाईकर यांच्याशी संपर्क साधला असता, “संबंधित वायरमनकडून चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल,” असे त्यांनी सांगितले.
या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून, भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी धोकादायक विद्युत तारा व यंत्रणांची तातडीने तपासणी करून दुरुस्ती करावी, तसेच संबंधित निष्काळजी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
बापुराव चौधरी उपसंपादक