सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : हवेली तालुक्यातील थेऊर, नायगाव व हिंगणगाव (AG) कृषी फिडरअंतर्गत येणाऱ्या सर्व गावांना पूर्वीप्रमाणे दिवसा वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे मुळशी विभागाचे कार्यकारी अभियंता देविदास बैकर तसेच आमदार ज्ञानेश्वर कटके यांना निवेदन दिले आहे.

सध्या या फिडरअंतर्गत येणाऱ्या गावांमधील शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेत वीजपुरवठा केला जात असल्याने सिंचनासाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. रात्री शेतात जाऊन विद्युत मोटारी सुरू करणे, पाणी व्यवस्थापन करणे यामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. परिसरात बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, रात्रीच्या वेळी विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यापूर्वी या भागातील गावांना दिवसा वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना शेतीची कामे आणि सिंचनाचे नियोजन सुलभपणे करता येत होते. सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असल्याने दिवसा वीजपुरवठा उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक असल्याचे काकडे यांनी म्हटले आहे.

थेऊर, नायगाव व हिंगणगाव AG फिडरअंतर्गत येणाऱ्या सर्व गावांना पूर्वीप्रमाणे दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यासाठी महावितरण प्रशासनाने तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी युवराज काकडे यांनी केली आहे.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *