सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : रक्तदान हे केवळ दान नसून एका मानवाने दुसऱ्या मानवाला दिलेले अमूल्य जीवदान असते. या उदात्त भावनेचा प्रत्यय ड्रीम फाउंडेशन संचलित रक्तदान शिबिरात आला. बी. जी. शिर्के प्राथमिक विद्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराला उरळी कांचन पंचक्रोशीतील नागरिक आणि रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि निस्वार्थ सेवेची भावना जपत अनेक युवक, नागरिक आणि नियमित रक्तदाते मोठ्या संख्येने शिबिरात सहभागी झाले.

रक्तदानामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळते, ही जाणीव ठेवून रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतला. रक्तपेढ्यांनाही अशा रक्तदानातून जीवनरक्षक साठा उपलब्ध होत असल्याने या उपक्रमाचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले.

यावेळी विशेष आकर्षण ठरले ते विक्रमी रक्तदाते बाळासाहेब पवार यांचे. त्यांनी या शिबिरात रक्तदान करत आपल्या रक्तदानाची रौप्यमहोत्सवी नोंद केली. तब्बल २५ वेळा रक्तदान करून त्यांनी समाजासमोर सेवाभावाचा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचे ड्रीम फाउंडेशन तसेच ग्रामस्थांच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आले.

सन्मान सोहळ्यात उपस्थितांनी बाळासाहेब पवार यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सातत्यपूर्ण रक्तदानातून अनेकांना प्रेरणा मिळत असून समाजात रक्तदानाविषयी सकारात्मक जागरूकता निर्माण होत आहे. “रक्तदान ही मानवतेची खरी पूजा आहे,” असा संदेश त्यांच्या कार्यातून अधोरेखित झाला.

या प्रसंगी साहित्यिक भास्कर भोसले यांनी बाळासाहेब पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांचे हार्दिक स्वागत केले. त्यांनी रक्तदात्यांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक करत समाजातील प्रत्येक सक्षम व्यक्तीने नियमित रक्तदान करून गरजूंना जीवनदान देण्याचे आवाहन केले.

ड्रीम फाउंडेशनच्या या स्तुत्य उपक्रमामुळे समाजात मानवता, संवेदनशीलता आणि परस्पर सहकार्याची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *