
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : ग्रामपंचायत निवडणुका जवळ येत असताना कोरेगावमुळ (ता. हवेली) येथे एका नव्या नेतृत्वाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना स्वतःच्या कर्तृत्वावर आणि जनसंपर्काच्या बळावर सर्वसामान्यांच्या मनात वेगळे स्थान निर्माण करणारे समाधान परशुराम अवचट यांचे नाव इच्छुक उमेदवार म्हणून पुढे येत आहे. त्यामुळे गावातील पारंपरिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून काही मोजक्याच प्रस्थापितांच्या भोवती फिरणाऱ्या ग्रामराजकारणाला पर्याय म्हणून समाधान अवचट यांच्याकडे पाहिले जात आहे. “निवडणूक लढवण्याचा अधिकार फक्त प्रस्थापितांनाच आहे का? सर्वसामान्य कुटुंबातील तरुण नेतृत्वाने पुढे येऊ नये का?” असा थेट सवाल त्यांच्या समर्थकांकडून उपस्थित केला जात आहे.

उत्कृष्ट निवेदक, कृतीशील विचारांचे नेतृत्व, दूरदृष्टी असलेला तरुण आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा समन्वयक अशी अवचट यांची ओळख निर्माण झाली आहे.
सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांतून त्यांनी गावाशी मजबूत नाळ जोडली आहे. याच जनसंपर्काच्या बळावर ते आता ग्रामविकासाच्या राजकारणात सक्रिय भूमिका घेण्यास उत्सुक असल्याचे बोलले जात आहे.

कोरेगावमुळसह परिसरात वेगाने नागरीकरण होत असून त्यातून पायाभूत सुविधा, वाहतूक, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि नागरिकांच्या विविध प्रश्नांमध्ये वाढ होत आहे. या समस्यांवर दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी सक्षम आणि अभ्यासू नेतृत्वाची गरज असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. या पार्श्वभूमीवर समाधान अवचट यांचे नाव चर्चेत आले आहे.

“गावातील वंचित, दुर्लक्षित आणि सर्वसामान्य घटकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाशी योग्य समन्वय साधून काम करणार आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहीन,” असे समाधान अवचट यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले, “ज्या कोरेगावमुळ गावाने मला निवेदक म्हणून तालुकाभर ओळख मिळवून दिली, त्या गावाचे ऋण फेडण्याची ही वेळ आहे. ग्रामविकास, पारदर्शक कारभार आणि सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग या त्रिसूत्रीवर काम करण्याचा माझा निर्धार आहे.”

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाधान अवचट यांच्या नावाची वाढती चर्चा पाहता, कोरेगावमुळच्या राजकारणात यंदा प्रस्थापितांसमोर नव्या नेतृत्वाचे आव्हान उभे राहण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
बापुराव चौधरी उपसंपादक