सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : पर्यावरण संवर्धनाची सामाजिक बांधिलकी जपत आणि कै. दादू बाप्पू लोणारी यांच्या स्मृतींना अभिवादन करत हिंगणगाव येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षवाटपाचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

माननीय श्री. मुकुंद दादू लोणारी, उरुळी कांचन यांच्या पुढाकारातून रविवार, दि. ७ जून २०२६ रोजी मांगिरबाबा देवस्थान परिसरालगतच्या घराघरांत वृक्षांचे वाटप करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.

मा. श्री. सागर आनंता थोरात (माजी सरपंच, हिंगणगाव) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने ग्रामस्थांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि घटत चाललेले हरितावरण या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.

कार्यक्रमास हिंगणगावच्या सरपंच सौ. शशिकला पोपळघट यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच डॉ. आण्णाभाऊ साठे क्रांती सेना, हवेली तालुका अध्यक्ष भारत कैलास लोणारी, दादाराम शेंडगे, सूरज साळवे, निशिकांत मुकुंद लोणारी, किरण पवार, सुनील थोरात (सर), ग्रामपंचायतीचे आजी-माजी सदस्य, सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याशिवाय यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक आदरणीय कुंडलिक (दादा) थोरात यांची उपस्थिती कार्यक्रमास विशेष प्रेरणादायी ठरली. उपस्थित मान्यवरांनी वृक्षसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत ग्रामीण भागात हरित चळवळ अधिक बळकट करण्याची गरज व्यक्त केली.

वृक्षवाटपाच्या माध्यमातून केवळ रोपे देणे हा उद्देश नसून, प्रत्येक कुटुंबाने त्या वृक्षांचे संगोपन करून पर्यावरण रक्षणात सक्रिय सहभाग नोंदवावा, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली. मांगिरबाबा देवस्थान परिसर हरित करण्याच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे परिसरात उत्साहाचे आणि पर्यावरणप्रेमाचे वातावरण निर्माण झाले.

कै. दादू बाप्पू लोणारी यांच्या स्मृती जपत आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम ग्रामविकास आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम ठरला. सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव आणि निसर्गाविषयीची कृतज्ञता व्यक्त करणारा हा वृक्षवाटप कार्यक्रम हिंगणगावच्या पर्यावरण इतिहासातील एक उल्लेखनीय पाऊल ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *