सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : संगीत, कला आणि समाजसेवेचा सुंदर संगम घडविणारे ज्येष्ठ संगीतकार शिवराज साने यांच्या वाढदिवसानिमित्त आणि त्यांना प्राप्त झालेल्या प्रतिष्ठित पद्मश्री डॉ. मनीभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्काराच्या निमित्ताने ऊरूळी कांचन येथे विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सतीश राजवाडे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व शुभेच्छा देऊन साने यांचा गौरव करण्यात आला.

‘दैवत माझे मल्हारी’ आणि ‘अंत्येष्टी’ या चित्रपटांमधील आपल्या प्रभावी अभिनयाने रसिकांच्या मनात स्थान निर्माण करणारे सतीश राजवाडे यांनी शिवराज साने यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला.

महाराष्ट्रभर विविध सामाजिक जनजागृती पथनाट्ये, सांस्कृतिक उपक्रम आणि संगीतकला क्षेत्रात तब्बल आठ वर्षे त्यांनी साने यांच्यासोबत कार्य केल्याचे त्यांनी सांगितले.

अभिनय क्षेत्राबरोबरच शिक्षण क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य करणारे सतीश राजवाडे यांनी ‘हा स्पर्श मायेचा’, ‘स्वर्गावर स्वारी’ तसेच ऐतिहासिक महानाट्य ‘जाणता राजा’ यांसारख्या गाजलेल्या नाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप उमटविली आहे. समाजभूषण पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार आणि संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता पुरस्कार अशा अनेक मानाच्या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.

अशा मान्यवर व्यक्तिमत्त्वाकडून मिळालेला सन्मान हा शिवराज साने यांच्या संगीत, संस्कार आणि समाजसेवेच्या कार्याला मिळालेली पावती असल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली.


या प्रसंगी सम्राट बहुउद्देशीय जनजागृती संस्थेच्या अध्यक्षा सौ. रेखा शिवराज साने, ऊरूळी कांचन, कुंजीरवाडी व लोणी काळभोर येथील संगीत वर्गांचे विद्यार्थी, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच पत्रकार-वार्ताहर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शुभेच्छांचा वर्षाव आणि कृतज्ञतेच्या भावनांनी भारलेला हा सोहळा अविस्मरणीय ठरला.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *