
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
भोर : शाळेतून घरी परतत असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका रिक्षाचालकाविरुद्ध भोर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जून रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी शाळेचे तास संपल्यानंतर घरी जात होती. त्यावेळी आरोपी विजय साळेकर (रा. ता. भोर, जि. पुणे) याने रस्त्यात रिक्षा आडवी लावून मुलीला अडविल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिचा हात पकडून तिला जबरदस्तीने रिक्षाकडे ओढले तसेच रिक्षामध्ये बसण्यास सांगितले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, आरोपीने मुलीशी अयोग्य स्वरूपाचे संभाषण करून तिच्या मनात भीती व लज्जा निर्माण होईल असे कृत्य केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

घटनेनंतर पीडितेच्या वडिलांनी भोर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे भोर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १३८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १२६(२), ७४ तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक खोत करीत असून पोलिस निरीक्षक निलेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. दरम्यान, आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
बापुराव चौधरी उपसंपादक
