सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : मोशी येथील इंडियन ऑइल काजळे पेट्रोल पंपाजवळ झालेल्या भीषण अपघातात ३० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. १०) दुपारी सुमारे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. पांडुरंग एकनाथ कुचेकर हे त्यांच्या अॅक्टिव्हा दुचाकीवरून बहिण सविता दयानंद कांबळे (वय ३०) यांना मोशीतील इंडियन ऑइल काजळे पेट्रोल पंप परिसरातून आदर्शनगर येथील घरी घेऊन जात होते.

यावेळी कंटेनर (क्र. NL ०१ AD २८४५) चालक सुंदर पंढरीनाथ गवळी (वय २६) याने वाहन भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करत दुचाकीला जोरदार धडक दिल्याचा आरोप आहे.

या अपघातात सविता कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार पांडुरंग कुचेकर गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी पांडुरंग कुचेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात कंटेनर चालक सुंदर गवळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *