सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : लोणी काळभोर तहसील कार्यक्षेत्रासाठी मंजूर झालेले सेतू सुविधा केंद्र पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील मांजरी बुद्रुक येथे स्थलांतरित करण्याच्या हालचालींना लोणी काळभोर ग्रामपंचायतीने तीव्र विरोध दर्शविला आहे. हे केंद्र लोणी काळभोरमध्येच सुरू करण्यात यावे, अन्यथा ग्रामीण भागातील हजारो नागरिकांची मोठी गैरसोय होईल, असा इशारा ग्रामपंचायतीने दिला आहे.

यासंदर्भात ग्रामपंचायतीच्या प्रशासकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून मंजूर सेतू सुविधा केंद्र मांजरी बुद्रुक येथे हलविण्याचा प्रस्ताव तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. ग्रामपंचायतीच्या निवेदनानुसार, लोणी काळभोर तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रासाठी मंजूर झालेले हे केंद्र ग्रामीण नागरिकांच्या सोयीसाठी देण्यात आले आहे. मात्र ते शहराच्या हद्दीतील मांजरी बुद्रुक येथे हलविल्यास लोणी काळभोरसह कुंजीरवाडी, थेऊर, कदमवाकवस्ती, कोलवडी, आळंदी म्हातोबाची आणि परिसरातील इतर गावांतील नागरिकांना महसूल व शासकीय सेवांसाठी अतिरिक्त प्रवास करावा लागणार आहे.

दाखले, प्रमाणपत्रे, ऑनलाइन अर्ज, महसूल विभागाशी संबंधित कामे आणि विविध शासकीय सेवा मिळविण्यासाठी नागरिकांना वारंवार मांजरी बुद्रुक येथे जावे लागेल. त्यामुळे वेळ आणि पैशाचा अतिरिक्त भार सहन करावा लागेल, असे ग्रामपंचायतीने निवेदनात नमूद केले आहे.

दरम्यान, महसूल विभागाने लोणी काळभोर तहसील कार्यक्षेत्रासाठी सेतू सुविधा केंद्र मंजूर केले असताना ते शहरी भागात हलविण्याची आवश्यकता काय, असा सवाल ग्रामपंचायतीने उपस्थित केला आहे. लोणी काळभोर परिसर हा झपाट्याने विकसित होणारा आणि मोठ्या लोकसंख्येचा ग्रामीण पट्टा असून येथेच सेतू केंद्राची सर्वाधिक गरज असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

अपर तहसील कार्यालय, लोणी काळभोर यांनी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात कार्यालयात अपुरी जागा असल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार पुणे महानगरपालिकेच्या मांजरी बुद्रुक येथील क्षेत्रीय कार्यालय किंवा ग्रामपंचायत इमारतीत सेतू सुविधा केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी तृप्ती कदम यांनी हडपसर क्षेत्रीय कार्यालयाला पत्र पाठवून मांजरी बुद्रुक येथील ग्रामपंचायत इमारतीत जागा उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याचे समजते.

मात्र, लोणी काळभोर ग्रामपंचायतीने सेतू सुविधा केंद्रासाठी गावातच ग्रामपंचायत मालकीची जागा उपलब्ध असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे नागरिकांच्या हिताचा विचार करून हे केंद्र लोणी काळभोरमध्येच कार्यान्वित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

ग्रामीण भागासाठी मंजूर झालेले केंद्र शहराच्या हद्दीत नेण्याच्या प्रस्तावामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. “तहसील लोणी काळभोरची आणि सेतू केंद्र मांजरीत” हा निर्णय अन्यायकारक असून ग्रामीण नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक आणि मानसिक भार टाकणारा ठरेल, अशी भावना अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

ग्रामपंचायतीने स्पष्ट शब्दांत विरोध नोंदवल्याने सेतू सुविधा केंद्राच्या प्रस्तावित स्थलांतराचा मुद्दा आता चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणात जिल्हाधिकारी आणि महसूल प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे लोणी काळभोर परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले असून पुढील निर्णयावर या वादाची दिशा अवलंबून राहणार आहे.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *