सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : उरुळी कांचन येथील बहुप्रतिक्षित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी आवश्यक जागेबाबत सकारात्मक निर्णय झाल्याने ‘कचरा-मुक्त उरुळी कांचन’ या संकल्पनेच्या पूर्ततेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशनच्या वतीने जागतिक रक्तदान दिनानिमित्त बी. जी. शिर्के प्राथमिक शाळा, उरुळी कांचन येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिर व पर्यावरणपूरक ‘प्लास्टिक बँक’ उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ही माहिती देण्यात आली.

कार्यक्रमात जिल्हा परिषद पुणेचे अध्यक्ष विरधवल (बाबा) जगदाळे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी उरुळी कांचनसाठी प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची गरज अधोरेखित करत प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. ग्रामदूतांनी अनेक वर्षे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना महात्मा गांधी सर्वोदय संघाचे उपाध्यक्ष के. डी. (बापू) कांचन यांनी प्रकल्पासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे जागा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगत आवश्यक औपचारिकता लवकरच पूर्ण करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नाला सकारात्मक दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रमात ‘प्लास्टिक बँक’ या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत नागरिकांनी घरातील स्वच्छ व वर्गीकृत प्लास्टिक कचरा जमा करायचा असून त्याबदल्यात प्रोत्साहनपर मोबदला दिला जाणार आहे. गृहिणींना एक किलो स्वच्छ प्लास्टिकच्या बदल्यात एक किलो साखर, तर विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, कंपास बॉक्स आदी शालेय साहित्य देण्यात येणार आहे.

पर्यावरण संवर्धनासह कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
जागतिक रक्तदान दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल ८०६ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. या शिबिरात ससून रक्तपेढी, तर्पण ब्लड बँक, स्पंदन ब्लड बँक आणि अक्षय ब्लड बँक यांनी रक्तसंकलनाचे कार्य केले.

यावेळी ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशनच्या कार्याचा आढावा सादर करण्यात आला. संस्थेने २०२० पासून आयोजित केलेले हे सलग तेरावे रक्तदान शिबिर असून आजवर राज्यातील १,३५० हून अधिक गरजू रुग्णांना रक्तपुरवठा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तसेच शिंदवणे घाट व परिसरात १३ हजारांहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली असून त्यापैकी सुमारे ८७ टक्के वृक्षांचे यशस्वी संवर्धन करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले.


या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, रक्तदाते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशनचे ग्रामदूत, स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या उभारणीसंदर्भात सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याने ‘कचरा-मुक्त उरुळी कांचन’ या स्वप्नपूर्तीसाठी महत्त्वाचा टप्पा पार पडल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋषीकेश भालेराव यांनी केले. प्रास्ताविक संतोष चौधरी यांनी, तर आभार प्रदर्शन मंदार खरात यांनी केले.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *