सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बाणेर रोड परिसरातील वाहतूक व्यवस्था, पावसाच्या पाण्याचा निचरा आणि मेट्रो प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या विविध नागरी समस्यांचा आढावा घेण्यासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांनी हॉटेल ग्रीन पार्क ते विद्यापीठ चौक या मार्गाची संयुक्त पाहणी केली. यावेळी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक उपाययोजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

पाहणीदरम्यान विद्यापीठ चौक तसेच हॉटेल महाबळेश्वर परिसरात गतवर्षी पावसाळ्यात पाणी साचल्याने निर्माण झालेल्या समस्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विद्यापीठ चौकापासून संपूर्ण मार्गावरील पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत आणि परिणामकारक होण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी चार दिवसांच्या आत आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले.

सिंध सोसायटी व नॅशनल सोसायटीसमोरील मेट्रो प्रकल्पाच्या कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पडून असलेला बांधकामाचा मलबा आणि राडारोडा यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले. तसेच विस्कळीत झालेले दुभाजक, असमतल रस्ते, नादुरुस्त पदपथ, कमी झालेली रस्त्याची रुंदी आणि आयसर संस्थेसमोरील बंद पडलेली पावसाळी वाहिनी यांचीही पाहणी करण्यात आली. संबंधित विभागांनी या सर्व बाबींवर तातडीने कार्यवाही करून कामे पूर्ण करावीत, अशा सूचना देण्यात आल्या.

विद्यापीठ चौक हा शहरातील महत्त्वाचा वाहतूक केंद्रबिंदू असून येथे व्हीव्हीआयपींची वारंवार ये-जा होत असते. या पार्श्वभूमीवर औंधकडे जाणाऱ्या जंक्शनजवळ पाणीपुरवठा विभागामार्फत सुरू असलेले खोदकाम पुढील दोन दिवसांत पूर्ण करून रस्ता पूर्ववत करण्याचे निर्देशही देण्यात आले.

दरम्यान, बाणेर रोड परिसरातील वाहतूक कोंडी, पावसाळ्यातील जलनिस्सारणाच्या अडचणी आणि मेट्रो प्रकल्पामुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांबाबत माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. स्थानिक नागरिकांकडून प्राप्त झालेल्या तक्रारी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत त्यांनी या प्रश्नांच्या निराकरणासाठी पुढाकार घेतला होता. त्यानुसार संबंधित विभागांच्या समन्वयातून ही संयुक्त पाहणी आयोजित करण्यात आली.

यावेळी अतिरिक्त आयुक्त दिवटे यांनी मेट्रो विभाग, पथ विभाग, पाणीपुरवठा विभाग, ड्रेनेज विभाग तसेच संबंधित क्षेत्रीय कार्यालयांनी समन्वय साधून पावसाळ्यापूर्वी सर्व प्रलंबित कामे पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश दिले. तसेच पावसाळी वाहिन्या, चेंबर्स आणि जलनिस्सारण व्यवस्थेची तातडीने साफसफाई करून पदपथांवरील राडारोडा हटविण्याचे आदेशही देण्यात आले.
या संयुक्त पाहणीस अधीक्षक अभियंता अभिजित आंबेकर, सनी निम्हण, भक्ती गायकवाड, सपना छाजेड, गजानन पाटील, सुमित यादव, योगेश मंद्रा, राज धनशेट्टी यांच्यासह पीएमआरडीए, मेट्रो, पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि क्षेत्रीय कार्यालयांतील अधिकारी व अभियंते उपस्थित होते.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *