
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळातील कथित भ्रष्टाचार आणि भोंगळ कारभाराबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने वेळोवेळी आयुक्तांकडे तक्रारी केल्या आहेत. पुनावळे येथील मनपा शाळेसाठी आरक्षित जागा तुटपुंज्या भाड्याने खासगी संस्थेला देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत, हा निर्णय रद्द करावा आणि त्या ठिकाणी मनपाने गोरगरिबांच्या मुलांसाठी शाळा सुरू करावी, अशी मागणी पक्षाचे शहराध्यक्ष चेतन पवार यांनी केली. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला.

पिंपरी येथे शुक्रवारी (ता. १२) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख रोमी संधू, शहर समन्वयक कैलास नेवासकर, शहर कार्यालय सचिव ज्ञानेश्वर शिंदे, जिल्हा संघटिका अनिता तुतारे, चिंचवड विधानसभा संघटिका वैशाली काटकर, वैशाली कुलथे, पिंपरी उपशहर प्रमुख अमोल निकम, समन्वयक पार्थ गुरव, उपशहर प्रमुख दिलीप सावंत, श्रीमंत गिरी, विशाल चव्हाण, योगेश राऊत, उज्वला सावंत, तस्लीम शेख, कलावती नाटेकर, बेबी सय्यद, पूनम रिठे, वंदना खंडागळे आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘‘पुनावळे येथील शाळेचे आरक्षण ईस्ट ऑक्सफर्ड इंटरनॅशनल फाउंडेशनला भाडे कराराने देऊ नये. भूमी जिंदगी कार्यालयाकडून प्रती चौरस फूट ३ रुपये ६० पैसे इतका भाडे दर निश्चित करण्यात आला आहे. हा दर कोणत्या निकषांवर ठरविण्यात आला, याची स्पष्टता नाही. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार संशयास्पद वाटत आहे. संबंधित जागेवर मनपाने स्वतः दर्जेदार शाळा उभारून सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी.’’

मनपा शाळांतील विद्यार्थ्यांसाठी शालेय गणवेश पुरविण्याचा ठराव कोणतीही निविदा प्रक्रिया न राबविता ‘जगदंब महिला रेडीमेड ड्रेसेस’ या संस्थेला देण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रक्रियेमध्ये गणवेशाचा खर्च वाढवून दाखविण्यात आल्याचा संशय व्यक्त करत संबंधित ठराव रद्द करून कायदेशीर निविदा प्रक्रिया राबवावी, अशी मागणी त्यांनी केली.

याशिवाय शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना नदीची दुरवस्था झाल्याचे सांगत नदीपात्रात राडारोडा टाकून ते अरुंद करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. काही ठिकाणी थेट पाइपलाइनद्वारे सांडपाणी नदीत सोडले जात असून, रावेत येथील महामार्ग पुलाखाली जुगार आणि कचरा टाकण्याचे प्रकार सुरू असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

ताथवडे येथील सर्व्हे क्रमांक ६४/२/१ मधील जागेच्या विकासकामात नगररचना विभागाने मूळ आराखड्यात नाला दर्शविला असताना बांधकाम आराखडा मंजूर करताना तो ‘सी’ आकारात वळविण्यात आल्याचा आरोप पवार यांनी केला. त्यामुळे नागरिकांचे नुकसान होण्याची शक्यता असून संबंधित बांधकाम परवाना रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली.
तसेच ताथवडे गावातील जिल्हा परिषद शाळा महानगरपालिकेकडे वर्ग करण्याबाबत २०१३ मध्ये शासन आदेश झालेला असतानाही अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.

महानगरपालिकेतील हा मनमानी कारभार तातडीने थांबवावा, अन्यथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पवार यांनी दिला.
बापुराव चौधरी उपसंपादक