
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : दीड महिन्यांच्या प्रदीर्घ उन्हाळी सुट्टीनंतर शाळेची पहिली घंटा वाजताच विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने न्यू इंग्लिश स्कूल, अष्टापूरचे संपूर्ण प्रांगण पुन्हा एकदा जिवंत झाले. नव्या शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी सजलेल्या शाळेत ‘प्रवेश उत्सवा’चे आयोजन उत्साहपूर्ण आणि आनंदमय वातावरणात करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील उत्सुकता, नव्या पुस्तकांचा सुवास आणि मित्रमैत्रिणींना भेटण्याचा आनंद यामुळे शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय ठरला.

आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदर संचलित या विद्यालयात विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा प्रशासनाने विशेष तयारी केली होती. शाळेत दाखल होताच विद्यार्थ्यांचे प्रेमळ स्वागत करण्यात आले. यावेळी अष्टापूरचे प्रसिद्ध उद्योगपती राजेश सुदाम कोतवाल यांनी विद्यालयाला ‘कॅनोन’ कंपनीची झेरॉक्स मशीन सप्रेम भेट देत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. त्यांच्या या दानशूर योगदानाबद्दल उपस्थितांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

कार्यक्रमात विद्यालयाची माजी विद्यार्थिनी अनुष्का निकाळजे हिची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल शाल, श्रीफळ आणि गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला. आपल्या शाळेतील विद्यार्थिनीने मिळविलेल्या या यशामुळे उपस्थित विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळाली.
शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. हातात आलेली नवी कोरी पुस्तके आणि त्यांचा दरवळणारा सुवास अनुभवताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. पहिल्याच दिवशी अभ्यासाचा ताण न देता विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजक खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दुपारच्या भोजनात गोड खाऊ म्हणून बालुशाही देण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला.

विद्यालयाच्या स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्रीहरी कोतवाल यांनी अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांचे स्वागत करताना, “अभ्यासासोबतच विविध शैक्षणिक व क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होऊन शाळेचे आणि गावाचे नाव उज्ज्वल करा,” असे आवाहन केले.
मुख्याध्यापिका दिपाली दळवी यांनी प्रस्ताविकातून विद्यार्थ्यांना नियमित उपस्थिती, दर्जेदार शिक्षण आणि शिस्तीचे महत्त्व पटवून दिले. “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा सदैव कटिबद्ध राहील,” असा विश्वास त्यांनी पालकांना दिला.

या कार्यक्रमाला आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठान पुरंदरचे नियामक मंडळ सदस्य रमेश कोतवाल, संस्था व शाळा समन्वयक तथा माजी मुख्याध्यापक सुभाष काळे, शालेय समिती सदस्य तयाजी जगताप, नितीन मेमाने, विजय कोतवाल, शामराव वारे, सुरेशराव कोतवाल, सुभाष बारीकराव कोतवाल, दिवाकर पिंगळे, राहुल शामराव कोतवाल, चंद्रकांत कोतवाल, पालक संघाचे अध्यक्ष राहुल पंढरीनाथ कोतवाल, केतन कोतवाल, मकरंद कोतवाल, सचिन कोतवाल, रमेश आबासो कोतवाल, नाना प्रकाश कोतवाल, महेश कोतवाल, पंचशील प्रतिष्ठानचे अध्यक्ष केतन निकाळजे यांच्यासह अनेक मान्यवर ग्रामस्थ, पालक व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पहिल्याच दिवशी मिळालेल्या या जंगी स्वागतामुळे विद्यार्थ्यांच्या मनात शाळेबद्दलची ओढ अधिक दृढ झाली असून नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंद, प्रेरणा आणि नवउमेदीने झाली आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे पर्यवेक्षक बाळासाहेब ढवळे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सहशिक्षक चौरंगनाथ कामथे यांनी मानले.
बापुराव चौधरी उपसंपादक