सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : पुणे जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील पंचायत समिती सभापतींची बैठक मंगळवारी पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडली. बैठकीत पंचायत समितींसमोरील विविध समस्या, अधिकार, विकासकामांसाठी आवश्यक निधी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.


यावेळी उपस्थित सभापतींनी सर्वानुमते आंबेगाव पंचायत समितीचे ज्येष्ठ सभापती कैलास बुवा काळे यांची पुणे जिल्हा तालुका पंचायत समिती सभापती असोसिएशनच्या अध्यक्षपदी, हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांची उपाध्यक्षपदी, तर बारामती पंचायत समितीचे सभापती किरण तावरे यांची सचिवपदी निवड केली.

निवडीनंतर संघटनेच्या वतीने सर्व तालुका पंचायत समिती सभापतींच्या विविध मागण्यांचे निवेदन पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांना देण्यात आले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांची भेट घेऊन पंचायत समितींसमोरील विविध प्रश्न व मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली.

नवनिर्वाचित अध्यक्ष कैलास काळे, उपाध्यक्ष युवराज काकडे आणि सचिव किरण तावरे यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यातील सर्व पंचायत समितींना भेडसावणाऱ्या विविध अडचणी, विकासकामांसाठी आवश्यक निधी, अधिकारवाढ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून जिल्हा व राज्य पातळीवर प्रभावी पाठपुरावा करण्यात येणार आहे. यासाठी लवकरच राज्याचे मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीस अध्यक्ष कैलास काळे, उपाध्यक्ष युवराज काकडे, सचिव किरण तावरे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), शिरूरच्या सभापती स्वाती घावटे, मावळच्या सभापती सुनीता येवले, भोरच्या सभापती मनीषा कंक, मुळशीच्या सभापती मंदा शेळके, राजगडच्या सभापती सुवर्णा राऊत, खेडच्या सभापती विद्या मोहिते, इंदापूरचे सभापती हर्षवर्धन लोंढे, पुरंदरचे सभापती अमित झेंडे आदी उपस्थित होते.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *