
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा हरवलेला मोबाईल फोन अवघ्या अर्ध्या तासात शोधून त्याच्या ताब्यात देत चंदननगर पोलिसांनी तत्परतेचे दर्शन घडविले. या कामगिरीबद्दल संबंधित विद्यार्थ्याने पोलिसांचे आभार मानले.

यश प्रमोद सरवदे हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा विद्यार्थी असून, मंगळवार (ता. १) रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत त्याचा मोबाईल फोन हरवला. मोबाईलमध्ये अभ्यासासाठी आवश्यक माहिती व महत्त्वाचा वैयक्तिक डेटा असल्याने तो चिंतेत होता. याबाबत माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी जगताप तसेच पोलिस निरीक्षक (गुन्हे) अमोल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किरण घुटे आणि सुशील बेंद्रे यांनी तात्काळ मोबाईलचे तांत्रिक पद्धतीने लोकेशन मिळविले. त्यानुसार संबंधित ठिकाणी जाऊन त्यांनी अत्यंत शिताफीने शोध घेतला. अवघ्या अर्ध्या तासाच्या प्रयत्नांनंतर हरवलेला मोबाईल फोन शोधून तो सुरक्षितपणे यश सरवदे यांच्या ताब्यात देण्यात आला.

वेगवान प्रतिसाद, तांत्रिक कौशल्य आणि समन्वयाच्या बळावर चंदननगर पोलिसांनी केलेल्या या कार्यामुळे विद्यार्थ्याला मोठा दिलासा मिळाला. हरवलेला मोबाईल अल्पावधीत परत मिळाल्याने यश सरवदे यांनी चंदननगर पोलिस ठाण्यातील अधिकारी व अंमलदारांचे मनःपूर्वक आभार मानले.

नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी चंदननगर पोलिस सातत्याने तत्पर असून, हरवलेल्या वस्तूंचा शोध घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला जात असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
बापुराव चौधरी उपसंपादक