
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : टिळेकरवाडी (ता. हवेली) येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या पोस्ट कार्यालयाचे उद्घाटन पुणे ग्रामीण डाक विभागाचे सहाय्यक अधीक्षक (एएसआय) सुखदेव मोरे यांच्या हस्ते, तसेच सरपंच सुशील राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन राजेंद्र टिळेकर होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी सरपंच सुभाष लोणकर यांनी प्रास्ताविक करताना गावातील विकासकामांचा आढावा घेतला. टिळेकरवाडीत पोस्ट कार्यालय सुरू करण्यासाठी पोस्ट विभाग, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी घेतलेल्या विशेष परिश्रमांबद्दल त्यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.

उद्घाटक सुखदेव मोरे यांनी पोस्ट विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध बचत व गुंतवणूक योजनांची सविस्तर माहिती दिली. टिळेकरवाडीतील विकासकामांचे कौतुक करत त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच, पुणे ग्रामीण विभागात अवघ्या आठ दिवसांत तब्बल १,०११ नवीन खाती उघडणारे टिळेकरवाडी पोस्ट कार्यालय हे एकमेव कार्यालय असल्याचे सांगितले.

यावेळी माजी सरपंच शांताराम टिळेकर यांनी पहिल्याच दिवशी एक लाख रुपयांची ठेव (डिपॉझिट) करून उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचा उल्लेखही करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात राजेंद्र टिळेकर यांनी गावातील विद्यमान व माजी सरपंचांचे स्वागत करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास खामगाव टेकचे विद्यमान उपसरपंच बाळासाहेब थोरात, माजी सरपंच संतोष टिळेकर, उपसरपंच कल्पना टिळेकर, माजी सरपंच गोवर्धन टिळेकर, गणेश टिळेकर, सुषमा टिळेकर, नंदा राऊत, वैशाली चौरे, प्रियंका कांबळे, टिळेकरवाडीचे पोलिस पाटील विजयराव टिळेकर, खामगाव टेकच्या पोलिस पाटील तनुजा थोरात, माजी सरपंच शांताराम टिळेकर, रोहिणी जगताप, बापूसाहेब ताम्हणे, कमल टिळेकर, सारिका थोरात, पुष्पा टिळेकर, माजी उपसरपंच दत्ता थोरात, प्रेमजी थोरात, सुभाष टिळेकर, अक्षय टिळेकर, विनोद बेगळे, रोहन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

पोस्ट कार्यालयाचे सय्यद साहेब व त्यांच्या संपूर्ण टीमने केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाधान अवचट यांनी केले, तर सरपंच सुशील राऊत यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
बापुराव चौधरी उपसंपादक
