सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : मातोश्री फाउंडेशन संचलित कै. सावित्रीबाई ससाणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, हडपसर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. गुरु-शिष्य परंपरेचे स्मरण करत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. पी. सातव होते. त्यांनी प्रास्ताविकात गुरुचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील स्थान अधोरेखित करत, “गुरु हा केवळ पुस्तकी ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा व आकार देणारा मार्गदर्शक असतो,” असे सांगितले.

प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे विश्वस्त डॉ. अमोल ससाणे, डॉ. मेघना भोसले आणि डॉ. रेश्मा चव्हाण उपस्थित होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. अमोल ससाणे म्हणाले, “ज्ञानाचे अनेक स्रोत उपलब्ध असले, तरी गुरुचे मार्गदर्शन आणि त्यांनी दिलेले संस्कारच आयुष्यात योग्य वाट दाखवतात. शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्याचे साधन नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे प्रभावी माध्यम आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच कठोर परिश्रम, शिस्त आणि नैतिक मूल्यांची जोपासना केल्यास ते भविष्यात जबाबदार नागरिक म्हणून घडतील.”

डॉ. मेघना भोसले यांनी शिक्षकांकडून मिळणारे संस्कार हीच विद्यार्थ्यांची खरी संपत्ती असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी दाखविलेल्या सन्मार्गावर चालावे, असे आवाहन केले.

या कार्यक्रमात ६० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी भाषणांमधून शिक्षकांबद्दलचा आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी डॉ. अर्चना कुदळे, डॉ. पल्लवी पाटील, सहायक प्राध्यापक कोमल मोरे, बालाजी भोई, सुरज अवचिते, पांडुरंग पाटील, श्री. काकासाहेब राजळे, श्री. सागर लडकत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकेतर कर्मचारी श्री. सोहेल शेख व भाग्यश्री बोराटे यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नीता बोडके यांनी केले, तर आभार सहायक प्राध्यापक तेजस मोरे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता सौहार्दपूर्ण वातावरणात झाली.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *