सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील गोळे वस्ती परिसरात
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शनिवारी (ता. 1) येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाला अभिवादन करण्यासाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमास माजी सरपंच संतोष ह. कांचन, अलंकार कांचन, योगेश कांचन, सुभाष बगाडे, प्रसाद कांचन, संतोष गायकवाड, अशोक चव्हाण, गोविंदा चव्हाण, सारिका लोणारी, रामदास टिळेकर, राजू अढागळे यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, समाजप्रबोधन आणि वंचित समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याची आणि सामाजिक समतेचा संदेश पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज असल्याचे मत वक्त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमादरम्यान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात यावा, अशी जोरदार मागणी उपस्थित मान्यवरांनी केली. त्यांच्या कार्याचा गौरव राष्ट्रीय स्तरावर होणे ही काळाची गरज असल्याचे यावेळी वक्त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक तसेच उपस्थितांचे आभार आबासाहेब चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे विशेष अभिनंदन केले आणि भविष्यातही अशा सामाजिक व प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहन केले.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *