
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने सराईत गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांनी कारवाईची मोहीम सुरू केली आहे. या कारवाईअंतर्गत लोणी काळभोर परिसरातील सराईत गुन्हेगार राज रविंद्र पवार (वय २८, रा. गुजरवस्ती, कवडीपाट टोलनाका, ता. हवेली, जि. पुणे) याच्यावर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असून, त्याला एक वर्षासाठी अमरावती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार याच्यावर लोणी काळभोर तसेच हडपसर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत शरीर व मालमत्तेविरुद्धचे तसेच इतर गंभीर स्वरूपाचे एकूण १४ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे आणि जनमानसात दहशतीचे वातावरण निर्माण होत असल्याने यापूर्वीही त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर ३ सप्टेंबर २०२४ रोजी एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबद्ध करून त्याची कोल्हापूर येथील कारागृहात रवानगी करण्यात आली होती.

मात्र, कारवाईनंतर पुन्हा लोणी काळभोर परिसरात आल्यानंतर पवार याने खुनाचा प्रयत्न, धोकादायक शस्त्राने दुखापत करणे, इतरांच्या जीवितास व वैयक्तिक सुरक्षिततेस धोका निर्माण करणारी कृत्ये, गंभीर स्वरूपाची धमकी देणे, मृत्यूची भीती दाखवून खंडणी मागणे तसेच बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यांसारखे गंभीर गुन्हे केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे त्याच्या कृत्यांमुळे सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाल्याने लोणी काळभोर पोलिसांनी त्याच्यावर पुन्हा एम.पी.डी.ए. कायद्यान्वये कारवाई केली.

पुणे शहराचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. पोलिस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलिस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलिस उपायुक्त (परिमंडळ-६) जीवन बेनिवाल आणि सहायक पोलिस आयुक्त, लोणी काळभोर विभाग अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप पवार, पोलिस निरीक्षक (गुन्हे) नंदकुमार कोळी, सहायक पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर यांच्यासह पोलिस हवालदार विलास शिंदे, पोलिस अंमलदार प्रशांत नरसाळे, योगिता भोसुरे, चेतन कुंभार, अमोल जाधव आणि गणेश शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
बापुराव चौधरी उपसंपादक
