सुवर्णा कांचन मुख्य संपादक

जातेगाव : जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथील श्री गुरुदत्त ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित जिजामाता सीनियर कॉलेजमध्ये शिक्षक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे होते.

शिक्षक दिनानिमित्त संस्थेचे अध्यक्ष कांतिलाल उमाप यांनी संदेशाद्वारे सर्वांना शुभेच्छा दिल्या. शिक्षकांच्या निःस्वार्थ योगदानामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य दिशा मिळते. तसेच त्यांच्या माध्यमातून समाजाच्या उज्ज्वल भवितव्याची पायाभरणी होते, असे त्यांनी नमूद केले.

प्राचार्य डॉ. शिवाजी बोऱ्हाडे यांनी उपस्थित प्राध्यापक तसेच विद्यार्थी-शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, ‘‘जगभरात शिक्षकांना आदराचे स्थान आहे. भारतातही शिक्षकांचा सन्मान करण्याची समृद्ध परंपरा आहे. मात्र, शिक्षकांच्या विविध प्रश्नांकडे आणि अपेक्षांकडे शासनाने अपेक्षित गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. शिक्षक हे समाजाच्या जडणघडणीतील महत्त्वाचे घटक असून, त्यांच्या कार्याला योग्य पाठबळ व प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे.’’

यावेळी वाणिज्य विभागप्रमुख डॉ. विजय गायकवाड, संगणकशास्त्र विभागप्रमुख प्रा. पूजा काळे, प्रा. सीमा बांगर, प्रा. सोनाली आव्हाळे आणि कार्यालय अधीक्षक सतीश काटकर यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व विशद केले.

कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडत प्रत्यक्ष अध्यापनाचा अनुभव घेतला. स्वरांजली इंदलकर, अजय सरडे, तन्वी उमाप, अनिषा उमाप, सेजल पटेल, दीक्षा इंगवले, संस्कृती भुजबळ, नम्रता सूर्यवंशी, ऋतुजा जाधव, श्रेया रणपिसे, रोशनी तांबे, दिव्या राठोड, मीनाक्षी यादव, प्रणाली जाधव, साक्षी टेमगिरे, श्रेया थिटे, नम्रता थोरात, प्रिया गायकवाड, वैष्णवी महारणवर, नंदकिशोर डोंगर, अनुजा पटणे, अक्षय वागदरे, प्राची पऱ्हाड, ज्ञानेश्वरी झेंडे, प्रथमेश वाघोले, साक्षी मुंजाळ, सुमित खंडागळे, लालाराम चव्हाण, रेश्मा भोसले, पायल केदारी, सानिया पिंजारी आणि पूजा गायकवाड यांनी अध्यापन केले. काही विद्यार्थी-शिक्षकांनी शिक्षकाची भूमिका पार पाडतानाचे अनुभव मनोगतातून व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. केशव उबाळे यांनी केले. सूत्रसंचालन वैजयंती गुंडाळ हिने केले. प्रा. प्रथमेश कुलाळ यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *