
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
सचिन सरवदे (प्रतिनिधी)
केडगाव (ता. दौंड) : सामर्थ्य जनशक्ती वैद्यकीय मदत कक्ष व ‘एक हात मदतीचा’ यांच्या संयुक्त विद्यमाने केडगाव (ता. दौंड) परिसरातील नागरिकांसाठी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांतर्गत नागरिकांची नेत्र तपासणी करून मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रियेसाठी एक गट पाठविण्यात आला आहे.

या उपक्रमामध्ये नेत्र तपासणीसोबतच पात्र रुग्णांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
सामर्थ्य जनशक्ती वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर विविध आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे तसेच विविध शासकीय व निमशासकीय उपक्रम सातत्याने राबविण्यात येतात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून १ ते ३० सप्टेंबरदरम्यान मोफत अँजिओग्राफी करण्यात येणार असून, ३० सप्टेंबरनंतर अल्पदरात अँजिओग्राफीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच पात्र रुग्णांच्या अँजिओप्लास्टी व बायपास शस्त्रक्रिया शासकीय योजनेंतर्गत मोफत करण्यात येत आहेत.
या सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रमासाठी मार्गदर्शक व आधारस्तंभ म्हणून जगन्नाथ माने पाटील व स्वप्निल माने पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे. सामर्थ्य जनशक्ती वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यप्रमुख सचिन सरवदे, पूर्व पुणे जिल्हा प्रमुख धनराज मसाळ, तसेच रोहित गाजरमल, गणेश जगताप व जहांगीर शेख यांचे या उपक्रमासाठी विशेष योगदान आहे.
गरजू नागरिकांना वेळेवर आणि परवडणाऱ्या दरात आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. सहकार्य एचव्ही देसाई रुग्णालय .
बापुराव चौधरी उपसंपादक
