
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : डॉ. मणिभाई देसाई पतसंस्थेच्या विविध योजनांचा सभासदांनी लाभ घ्यावा, कारण संस्थेचा कारभार पारदर्शक असून सदस्यांच्या विश्वासामुळेच संस्थेच्या प्रगतीचा आलेख चढता आहे, असे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनी सांगितले.

मणिश्रीकृष्ण सहकार संकुल सभागृहात शनिवारी (ता. १२) संस्थेची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. अध्यक्षपदावरून बोलताना राजेंद्र कांचन म्हणाले की, सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून संस्था दरवर्षी रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य तपासणी, गुणवत्ता विद्यार्थी सत्कार, वृक्षारोपण, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, वारकऱ्यांना अन्नदान, वैद्यकीय मदत तसेच शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करते. त्याचबरोबर विविध विषयांवर व्याख्यानांचे आयोजनही संस्थेतर्फे केले जाते.

संस्थेच्या आर्थिक परिस्थितीविषयी माहिती देताना कांचन म्हणाले की, ३१ मार्च अखेर संस्थेच्या ठेवी ३१२ कोटी १५ लाखांवरून ३६२ कोटी २४ लाखांपर्यंत वाढल्या आहेत. कर्जवाटप २७९ कोटी ३६ लाख झाले असून, ठेवी व कर्ज मिळून संस्थेचा संमिश्र व्यवसाय ६४१ कोटी ६० लाखांवर पोहोचला आहे. संस्थेची गुंतवणूक १२७ कोटी ०४ लाख असून, या वर्षअखेर संस्थेला ७ कोटी ११ लाख ढोबळ नफा व ५ कोटी ५४ लाख निव्वळ नफा झाला आहे. यंदा २१,७३६ सभासदांना १५ टक्के दराने लाभांश वाटप करण्यात येणार असून, त्याची एकूण रक्कम २ कोटी ०९ लाख रुपये इतकी आहे.

संस्थेच्या वार्षिक सभेचे कामकाज खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. संस्थेचे प्रेरणास्थान डॉ. मणिभाई देसाई यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन श्री ज्ञानोबा (माऊली) कांचन व श्री कोंडीराम (भाऊ) चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सर्वज्ञ चक्रधर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित पुणे या बँकेच्या संचालक मंडळाच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र बापू कांचन यांनी उभे रहावे. उरुळी कांचन गाव व संस्थेचे सर्व सभासद आपल्या पाठीशी आहोत असा ठराव पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य श्री महादेव कांचन यांनी मांडला. त्याला उरुळी कांचन चे माजी सरपंच संतोष कांचन यांनी अनुमोदन दिले. यावेळी ज्ञानेश्वर कौले, सुनील जगताप, अशोक टिळेकर, अमीन शेख, एल.बी.म्हस्के, गणेशप्रसाद चव्हाण या सभासदांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजेंद्र कांचन होते. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष रामदास चौधरी, संचालक शरद वनारसे, भाऊसाहेब कांचन, कांतीलाल चौधरी, संजय कांचन, खेमचंद पुरुसवाणी, संजय टिळेकर, ह.भ.प. जीवन शिंदे, धनसिंग पोंदकुले, अनिकेत कांचन, सौ सारिका काळभोर, सौ कमल कांचन, तज्ञ संचालक प्रवीण दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. संस्थेचा वार्षिक अहवाल वाचन मुख्य व्यवस्थापक लक्ष्मण वाल्हेकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार उपाध्यक्ष रामदास चौधरी यांनी मानले.
बापुराव चौधरी उपसंपादक
