सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : पुणे जिल्ह्याच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या सिंहगड किल्ला स्मारकाच्या जतन व दुरुस्तीच्या कामासाठी ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे किल्ले सिंहगडासह हवेलीच्या तालुक्याच्या वैभवात भर पडणार असल्याचे मत, हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी व्यक्त केले.

सिंहगड किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या ऐतिहासिक किल्ल्याचे वास्तुशिल्प, तटबंदी, ऐतिहासिक वास्तू व स्मारकांचे जतन होणे आवश्यक होते. त्यादृष्टीने शासनाकडून मंजूर झालेला भरीव निधी हा सिंहगडाच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

या निधीतून किल्ल्याच्या ऐतिहासिक वास्तूंची आवश्यक जतन, संवर्धन व दुरुस्तीची कामे, तसेच पर्यटक व शिवप्रेमींच्या दृष्टीने आवश्यक सुविधांच्या विकासाला चालना मिळणार असून त्याचसोबत येथील तिसरे छत्रपती राजाराम महाराज व नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मृती स्थळाकडेही शिवप्रेमींचा कल वाढणार असल्याचे शिवभक्तांनी सांगितले.

सिंहगड किल्ला महाराष्ट्राच्या शौर्य, पराक्रम आणि गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारे ऐतिहासिक स्मारक आहे. त्यामुळे या किल्ल्याचे संवर्धन करून त्याचा ऐतिहासिक वारसा पुढील पिढ्यांपर्यंत जतन करण्यासाठी शासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह असल्याची भावना शिवभक्तांनी व्यक्त केली.

सिंहगड किल्ल्याच्या जतन व दुरुस्तीसाठी भरीव निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, एकनाथजी शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिषजी शेलार, आमदार भीमराव तापकीर, आमदार ज्ञानेश्वर कटके व महायुती सरकारचे हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी, हवेली तालुक्याच्या वतीने आभार मानले.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *