
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
मुंबई : संगीत कला क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदानासह लोककलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन आणि जनजागृतीचे प्रभावी कार्य करणारे ज्येष्ठ संगीतकार शिवराज ज्ञानोबा साने यांना डोंबिवली येथे राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रविवार, दि. १५ नोव्हेंबर रोजी डोंबिवली (पूर्व) येथील श्री गणेश संस्थान, रेल्वे स्टेशनजवळ आयोजित युवा परिवर्तन परिषद व गुणगौरव सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कला, पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यात आला. यामध्ये संगीतकार शिवराज साने यांच्या अनेक वर्षांच्या संगीत साधनेची तसेच सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाची विशेष दखल घेण्यात आली.
शिवराज साने यांनी लोककलेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर समाजप्रबोधनाचे कार्य केले आहे. पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रूणहत्या प्रतिबंध, शिक्षणाचे महत्त्व, झाडे लावा, माती अडवा-पाणी जिरवा यांसारख्या विषयांवर त्यांनी गीतगायन, भारूड आणि पथनाट्यांच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. याशिवाय देशभक्तिपर गीते, आरोग्यविषयक संदेश, राष्ट्रीय सण आणि महापुरुषांच्या कार्यावर आधारित गीतांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक विचार रुजविण्याचे काम त्यांनी केले आहे.

शिक्षण, संगीत आणि जनजागृती यांचा त्रिवेणी संगम साधणारे शिवराज साने हे साने संगीत विद्यालयाचे संस्थापक आहेत. तसेच लोणी काळभोर येथील कदम वस्तीमधील रेनबो इंटरनॅशनल स्कूल आणि हडपसर येथील इनव्हिटिव्ह इंटरनॅशनल स्कूलमध्ये ते संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये संगीताची आवड निर्माण करण्याबरोबरच त्यांच्यावर सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्यांचे संस्कार करण्याचे कार्यही ते सातत्याने करीत आहेत.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रुती पारकर यांनी संगीताचे सामाजिक महत्त्व अधोरेखित केले. संगीत ही केवळ कला नसून ती संस्काराची, संस्कृतीची आणि समाजप्रबोधनाची प्रभावी भाषा आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सुनील गोडबोले, ज्येष्ठ अभिनेत्री रंजना मोहिते, नारीशक्ती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा, रत्नागिरी येथील मान्यवर, समाजसेवक अजय अरुण दळवी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष डॉ. बी. एन. खरात यांनी केले होते. तसेच सम्राट बहुउद्देशीय जनजागृती सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा रेखा साने यांची उपस्थिती होती.
बापुराव चौधरी उपसंपादक
