
सुवर्णा कांचन मुख्य संपादक
पुणे : जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम आणि खेळाप्रती असलेली निष्ठा यांच्या जोरावर आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा पुणे येथील इनोसंट टाइम्स स्कूलचे क्रीडाशिक्षक धनंजय लक्ष्मण मदने यांनी नाशिक येथे झालेल्या ७ व्या महाराष्ट्र राज्य मास्टर्स गेम्स २०२६ मैदानी क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल तीन सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले. त्यांच्या या देदीप्यमान यशामुळे क्रीडा क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल, नाशिक येथे महाराष्ट्र मास्टर्स गेम्स असोसिएशनच्या वतीने आयोजित या राज्यस्तरीय स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत धनंजय मदने यांनी आपल्या उत्कृष्ट शारीरिक क्षमता, वेग, तंत्र आणि अफाट मेहनतीच्या जोरावर तीनही स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांची कमाई केली.
त्यांनी ११० मीटर हर्डल्स – सुवर्णपदक, ३००० मीटर स्टीपलचेस – सुवर्णपदक आणि ४०० मीटर हर्डल्स – सुवर्णपदक, अशी एकूण तीन सुवर्णपदके पटकावून आपल्या क्रीडा कारकिर्दीत आणखी एक मानाचा तुरा रोवला.

विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षण देण्याबरोबरच स्वतः मैदानावर उतरून उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणादायी परंपरा धनंजय मदने यांनी जपली आहे. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या क्रीडा विकासासाठी कार्य करत असताना स्वतःच्या खेळातील सातत्य आणि सरावाच्या बळावर त्यांनी हे यश संपादन केले आहे. त्यांच्या या कामगिरीतून वय हे केवळ एक आकडा असून जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कोणत्याही वयात यशाची नवी शिखरे गाठता येतात, हा संदेश त्यांनी दिला आहे.

या स्पर्धेतील यशानंतर धनंजय मदने यांची नागपूर येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रीय मास्टर्स गेम्स स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय स्तरावरही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना मिळणार आहे. स्पर्धेच्या निमित्ताने जिल्हा क्रीडा अधिकारी मा. रविंद्र नाईक तसेच मास्टर्स गेम्स असोसिएशनचे सचिव श्री. बाळू चव्हाण यांच्या हस्ते सुवर्णपदक विजेते धनंजय मदने यांचा सन्मान करण्यात आला.

त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री व क्रीडामंत्री मा. ना. श्रीमती. सुनेत्रावहिनी अजितदादा पवार, महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री मा. ना. श्री. दत्तात्रय (मामा) भरणे साहेब, संसदरत्न खासदार मा. सुप्रियाताई सुळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी मा. जगन्नाथ लकडे तसेच इनोसंट टाइम्स स्कूलच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. अंकिता संघवी यांनी त्यांचे अभिनंदन करून आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

“मैदानावरचा सराव, मनातील जिद्द आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा कधीही वाया जात नाही,” याची प्रचिती धनंजय मदने यांच्या या यशातून पुन्हा एकदा आली आहे. त्यांच्या या सुवर्णमय कामगिरीमुळे उरुळी कांचन, पुणे जिल्हा आणि क्रीडा क्षेत्राची मान उंचावली आहे.
बापुराव चौधरी उपसंपादक