सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन परिसरात जलजीवन मिशनच्या कामामुळे दोन्ही शिवरस्त्यांची अक्षरशः दुरावस्था झाली होती. पाईपलाईन खोदाईनंतर रस्ते उखडून ठेवण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः पावसाळा तोंडावर आलेला असताना रस्त्यांची झालेली बिकट अवस्था पाहून ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली होती.

या पार्श्वभूमीवर हवेली पंचायत समिती सदस्य सुदर्शन चौधरी यांनी वेळोवेळी संबंधित विभागांकडे पाठपुरावा करत निवेदने दिली. अखेर त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश आले असून तब्बल १५ दिवसांच्या पाठपुराव्यानंतर ठेकेदारांनी पुन्हा रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात केली आहे. या रस्त्यांचे भूमिपूजनही करण्यात आले असून नागरिकांनी काहीसा दिलासा व्यक्त केला.

मात्र, या प्रकरणाला आता राजकीय वळण लागण्याची चिन्हे दिसत आहेत. जलजीवन मिशनच्या टेंडरमध्ये स्पष्टपणे नमूद असताना की, “पाईपलाईन खोदाईमुळे खराब झालेला रस्ता पूर्ववत करून द्यायचा,” तरीही काम रखडवण्यात आल्याची चर्चा स्थानिकांमध्ये रंगू लागली आहे. सरकारी खर्चातून होणारे काम केवळ निधीच्या राजकारणासाठी थांबवण्यात आले का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

“पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्त होणे अत्यंत गरजेचे असताना केवळ निधीसाठी अट्टाहास करून नागरिकांना वेठीस धरणे कितपत योग्य आहे?” असा संतप्त प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत. अनेक ठिकाणी खड्डे, चिखल आणि धुळीमुळे वाहनचालक तसेच पादचाऱ्यांचे हाल होत होते.

याबाबत जलजीवन मिशनचे उपअभियंता लखलास शेख यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “जलजीवन मिशनचे काम अजून अर्धवट अवस्थेत आहे. संबंधित विभागाकडून निधी उपलब्ध झाल्यास उर्वरित काम पुन्हा सुरू करण्यात येईल. तसेच पाईपलाईनमुळे ज्या रस्त्यांची दुरवस्था झाली, ते दुरुस्त करण्याची जबाबदारी आमचीच आहे. मात्र सध्या ते काम थांबवण्यात आले आहे. या रस्त्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा जिल्हा परिषदेकडून निधी मिळणार असल्याने सध्या आमच्याकडून ते काम थांबविण्यात आले आहे.”

दरम्यान, नागरिकांना आता एकच अपेक्षा आहे — राजकारण बाजूला ठेवून प्रशासनाने तातडीने रस्त्यांची कामे पूर्ण करावीत आणि पावसाळ्यापूर्वी उरुळी कांचनकरांना दिलासा द्यावा.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *