बापुराव चौधरी, उपसंपादक
ग्रेटर नोएडा : समाज कल्याण फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पातळीवरील ‘राष्ट्र गौरव पुरस्कार’ प्रदान सोहळा व अधिवेशन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या वेळी महाराष्ट्रातील ज्येष्ठ समाजसेवक, प्रवचनकार व अपंग सेवक डॉ. रवींद्र भोळे यांना अपर पोलीस आयुक्त डॉ. राजीव नारायण मिश्र यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरील प्रथम ‘राष्ट्र गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

पुरस्कारामध्ये सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह यांचा समावेश होता. मार्गदर्शन करताना डॉ. मिश्र यांनी सांगितले की, अशा पुरस्कारांमुळे देशाची शान वाढते व कार्यकर्त्यांना राष्ट्रकार्यासाठी प्रेरणा मिळते.
या प्रसंगी पीआयआयटी कॉलेजचे अध्यक्ष तथा एसकेएफआयचे संरक्षक प्रा. डॉ. भरत सिंह, माजी कुलपती प्रा. बी. एस. राजपूत, एसकेएफआयचे राष्ट्रीय अध्यक्ष जितेंद्र बच्चन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

डॉ. रवींद्र भोळे यांनी गेल्या ३५ वर्षांपासून सामाजिक, धार्मिक, वैद्यकीय व अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. प्रवचनातून व्यसनमुक्ती, कोरोना काळातील मदतकार्य, वृक्षारोपण, मराठवाडा भूकंप व इतर नैसर्गिक आपत्तीतील मदत, तसेच मूकबधिर व मतिमंद सेवेसाठी त्यांनी योगदान दिले आहे. राज्यभरातील २० हून अधिक संस्थांमध्ये ते कार्यरत असून ‘पद्मश्री डॉमणीभाई देसाई ट्रस्ट’च्या माध्यमातून पर्यावरण व युवकांसाठी विविध उपक्रम राबवित आहेत. तसेच त्यांच्या आरोग्य सेवा केंद्राद्वारे अत्यल्प दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जाते.
कार्यक्रमात विविध राज्यांतील कार्यकर्त्यांनाही सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातून अमोल पाटील (दिघी-भोसरी) यांना सामाजिक कार्यासाठी, तर जयवंत विनायक सिसोदे (पुणे) यांना शैक्षणिक कार्याबद्दल गौरविण्यात आले.
या वेळी एसकेएफआयचे संघटक सत्यनारायण प्रधान, कोषाध्यक्ष अमित सक्सेना, महासचिव सिद्धांत श्रीवास्तव, ललिता कच्छप, दीपक कुमार जंगल, रामस्वरूप भटनागर, दिनेशचंद्र गुप्ता, कुमार अभिनव, अशोक श्रीवास्तव आदी पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बबलू रावत यांनी केले, तर आभार आर. के. शक्य यांनी मानले.