सुवर्णा कांचन मुख्य संपादक

आश्वी (ता. संगमनेर) शिबलापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. सोमनाथ वेणूताई निवृत्ती गिते यांना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित “राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल परिसरातील ग्रामस्थांकडून गौरव करण्यात येत आहे.

व्यसनमुक्तीबाबत समाजात जनजागृती करणे, अभ्यासपूर्ण लेखन, मार्गदर्शन तसेच समाजहितासाठी सातत्याने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मा. मंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राज्यस्तरीय सन्मान प्राप्त झाल्यानंतरही आपल्या बालसंस्कारांची जाणीव ठेवत डॉ. गिते यांनी मातोश्री कै. वेणूताई निवृत्ती गिते व पिताश्री कै. निवृत्ती भाऊराव गिते यांच्या स्मरणार्थ शिबलापूर जिल्हा परिषद शाळेला गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी २१ हजार रुपयांची, तर प्रवरा माध्यमिक विद्यालयासाठी ११ हजार रुपयांची देणगी दिली.

यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संतोष गोसावी, सहशिक्षक रेखा गोसावी, रोहिणी राऊत, शकुंतला उगलमुगले, नागरे, सरपंच प्रमोद बोन्द्रे, माजी प्राचार्य आनंदाराव गिते, माजी प्राचार्य भिमराज बोन्द्रे तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शिंदे यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. शाळेची प्रगती भविष्यातही असेच नामांकित विद्यार्थी घडवेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

“यशाच्या शिखरावर पोहोचलेला विद्यार्थी हा आपल्या शाळेचा आदर्श विद्यार्थी असतो,” अशी भावना उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली. तसेच डॉ. गिते यांचा “आदर्श विद्यार्थी” म्हणून गौरव करण्यात आला. समाजासाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान होणे ही गावासाठी अभिमानाची बाब असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *