सुवर्णा कांचन मुख्य संपादक

पुणे : ऊरूळी कांचन ते शिंदवणे मार्गावरील काळे शिवार येथे मुळा-मुठा कालव्यावर उभारण्यात येणाऱ्या नवीन पुलाच्या कामाचे भूमिपूजन नुकतेच मोठ्या उत्साहात आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाले. या पुलामुळे परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची वाहतुकीची गैरसोय दूर होणार असून विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले जाणार आहे.

भूमिपूजन कार्यक्रमास आमदार माऊली कटके, पंचायत समितीचे सभापती युवराज काकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, प्रभारी सरपंच सौ. प्रमिलाताई कचरू शितोळे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष तथा माजी सरपंच गणेश महाडिक, माजी सरपंच सौ. सारिकाताई दिनानाथ महाडिक, सौ. शोभाताई आबासाहेब महाडिक, सौ. ज्योतीताई दत्तात्रय महाडिक, माजी उपसरपंच संजय डोबाळे, आनंद शितोळे, सागर खेडेकर, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष भुजंग महाडिक, नानासाहेब सुदाम महाडिक, सदस्य सचिन शिंदे तसेच दत्तात्रय गाडेकर, संभाजी भगवान महाडिक, दत्तात्रय बापू महाडिक, संग्राम भाऊसाहेब महाडिक यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सध्या या ठिकाणी असलेला पूल अरुंद असल्याने वाहनचालक, शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांना वाहतुकीदरम्यान अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास, शेतमालाची ने-आण आणि आपत्कालीन सेवांच्या वाहतुकीवर त्याचा परिणाम होत होता. त्यामुळे नवीन पुलाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होती.

नवीन पुलाच्या उभारणीनंतर वाहतूक अधिक सुरक्षित, वेगवान आणि सुरळीत होणार आहे. परिसरातील गावांमधील संपर्क अधिक मजबूत होण्यास मदत होणार असून शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत पोहोचविणे सुलभ होणार आहे. तसेच रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि अन्य आपत्कालीन सेवांना देखील मोठा दिलासा मिळणार आहे.

ग्रामस्थांनी पुलाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करत काम दर्जेदार पद्धतीने व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली. अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्णत्वाकडे वाटचाल करत असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ऊरूळी कांचन, शिंदवणे आणि परिसरातील गावांच्या विकासाला चालना देणारा हा पूल भविष्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

बापुराव चौधरी उपसंपादक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *